कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनिंग अँण्ड प्रेसिंग प्रा.लि. याठिकाणी कॉटन कॉपोरेशन ऑफ इंडिया (सी.सी.आय) अर्थात भारतीय कापूस प्राधिकरण अंतर्गत किमान आधारभूत दरानुसार शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र या हमीभाव केंद्राला कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी नुकतीच भेट देवून पाहणी केली.

या कापूस खरेदी केंद्रावर दोन हजारांहून अधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा तब्बल २५ हजार किंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

सभापती तापकीर यांनी केंद्राची पाहणी करून शेतकऱ्यांना याठिकाणी चांगल्यापैकी सुविधा दिल्या जात असल्याने ऑनलाईन पद्धतीने तात्काळ कापूस खरेदी होत आहे.तसेच केंद्रावर कापूस विक्री केलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पेमेंट जमा होत आहे.याबाबत विचारपूस करत समाधान व्यक्त केले.

सीसीआय अंतर्गत किमान आधारभूत दरानुसार कापूस हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्याने तीस दिवसांत छत्रपती जिनिंग याठिकाणी तब्बल २५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला असून या केंद्रावर चांगला प्रतिचा (सुपर) कापसाला प्रति क्विंटल ७ हजार ५२१ रूपये भाव देण्यात आला आहे.

कापूस हमीभाव खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या पदरी चांगला भाव मिळून अधिकचे पैसे मिळत असून या केंद्रावर कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांच्या देखरेखी खाली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्री करिता आणण्यास सुरुवात केली आहे.यामुळे या केंद्रावर आवक वाढली आहे.

यावेळी छत्रपती जिनिंग अँण्ड प्रेसिंगच्या वतीने कु.ऊ.बा समितीचे सभापती तापकीर यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी छत्रपती जिनिगचे संचालक दादासाहेब बांदल सर, राहुल पवार, ग्रेडर नितीन सोलो पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीसीआय अंतर्गत शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखीखाली शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात आहे.

खासगी बाजार भावात आणि केंद्रावरील बाजार भावात कापूस पिकाच्या प्रतिनुसार भावात मोठी तफावत व फरक असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्रात आपला कापूस विक्रीसाठी आणावा असे कर्जत तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी सांगितले.