झेंडूंच्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने झेंडू उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी ‘लक्ष्मी’ झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना प्रसन्न झाली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.दसरा-दिवाळीत झेंडूच्या फुलांना शंभरपासून दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळाला.
या दोन सणांच्या नंतर मार्गशीर्ष महिन्यात फुलांना चांगला भाव मिळत असतो.गुरुवारच्या दिवशी घरोघर महालक्ष्मीची पूजन करण्यात येते.मंदिरांमध्येही सजावट केली जात असते.त्यामुळे फुलांना चांगला भाव मिळत असतो.
याच आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झेंडूची लागवड केली.दसरा-दिवाळीत शिगेला पोहोचलेला भाव आता मात्र मागील एक महिन्यापासून एकदमच गडगडला आहे.बुधवारी मात्र या फुलांना एका किलोला दहा रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पदरी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिलयच च गुरुवार निराशा घेऊन आला.
झेंडूच्या एका रोपाची किंमत सव्वा रुपयापासून तीन रुपयांपर्यंत आहे.यात शेताची मशागत, लागवडीचा खर्च यानंतर त्याला द्यावी लागणारी रासायनिक खते, फवारणी, बांधणी व तोडणीचा खर्च असा सगळा विचार करता झेंडूच्या फुलांना किमान चाळीस रुपयांच्या पुढे भाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या पदरी थोडीफार रक्कम पडत असते.
मार्गशीर्ष महिन्यात पहिल्याच गुरुवारपासून झेंडूच्या फुलांचे भाव वाढत असतात, मात्र हे वर्ष त्याला अपवाद ठरत आहे. मागील वर्षी या दिवसांत किलोला पन्नास रुपयांपर्यंत भाव मिळाला.मात्र,मागील वीस दिवसांपासून भाव एकदम कमी झाले आहेत.इतर खर्च सोडाच, पण तोडणीचा खर्चही सुटत नाही.
त्यामुळे या फुलांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा पावसाचे चित्र निर्माण झाले असल्याने झाडांवरील बोजा कमी करणे आवश्यक असल्याने सध्या पदरखर्च करून फुले तोडावी लागत आहेत.