मागील महिन्यात तेजीत असलेल्या भाजीपाल्याचे दर सध्या अचानक कमी झाल्याचे दिसत आहे.मेथी, कोथिंबीरची जुडी अवघी दहा रुपयांना मिळत असून फ्लॉवर व कोबीचा गट्टा देखील दहा ते १५ रुपयांना विकत आहे. केवळ भाजीपाल्याचेच नव्हे, तर फळभाज्याचे देखील दर कमी झाल्याने काढणीचा व वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे.

येथील भाजीपाला मार्केटमध्ये अचानक आवक वाढल्याने गृहिणींना दिलासा मिळणार आहे.पहाटे बाजार समितीच्या भाजीपाला लिलावात श्रीरामपूर तालुक्यासह वैजापूर, गंगापूर भागातून मोठ्या प्रमाणात माल येतो. तेथून तो आठवडे बाजारासह येथील भाजीमंडीमध्ये किरकोळ विक्रीसाठी दाखल होतो.

सध्या वांगे, गिलके, दोडके दहा ते १५ रुपये पावशेर भावाने मिळत असल्याने भाजीपाला आता स्वस्त झाल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे.त्याचा रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.त्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी होईल,असा अंदाज होता.मात्र आवक कायम राहिल्याने दर मात्र कमी झाल्याचे दिसून येते.हिवाळ्यात मेथीच्या भाजीला चांगली मागणी असते. त्यामुळे दरही समाधानकारक मिळतो.पण आता किरकोळ भाजी विक्रेत्यांकडे मेथी दहा रुपयांना मिळत आहे.

तर चवळीच्या शेंगा, वाल दहा ते १५ रुपये पावशेर, डांगर १० रुपये, हिरवी मिरची व शिमला २० रुपये पावशेर दराने मिळत आहे.मार्केट मध्ये पेरूसह, बोर मोसंबी देखील विक्रीसाठी दाखल होत आहे.साधारणतः ४० रुपये किलो बोरं, तर पेरूची ८० रुपये किलोने विक्री होत आहे. मागील महिनाभर तेजीत असलेल्या भाजीपाल्याचे दर अचानकपणे कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

भाजीपाल्याचे दर कमी झालेले असताना शेवग्याच्या शेंगा, लसूणसह भेंडीच्या दरात मात्र तेजी कायम असल्याचे दिसते. शेवगा ८० ते १०० रुपये किलो असूनही तो बाजारात पुरेषा प्रमाणात मिळत नाही. तर भेंडीची मागणी कायम असताना आवक कमी झाल्याने दर टिकून आहे. तर टोमॅटो ४० रुपये किलो असल्याने त्याचे दर काही प्रमाणात टिकून आहे. बटाटे ४० ते ६० रुपये किलो दराने विकले जात आहे