Ahilyanagar News : आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ क्रमांकावर एका नागरिकाने माहिती दिल्यानंतर संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले.
यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. उर्वरित सहा जण पळून गेले. या प्रकरणी एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) रात्री ११:५७ वाजेच्या सुमारास पानोडी-वरंवडी घाटात करण्यात आली.
आकाश सुनील पाळंदे, रोहित भिरु मुळेकर, (दोघेही रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना पोलिसांनी पकडले. सिद्धू मकवाने (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता, पूर्ण नाव माहीत नाही), कादीर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर, पूर्ण नाव माहीत नाही),
शरद ऊर्फ गोट्या हरिभाऊ पर्बत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व इतर तीन अज्ञात इसम अशा एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात सहायक फौजदार बाबासाहेब भिकाजी पाटोळे (वय ५६, आश्वी पोलिस ठाणे, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पानोडी वरंवडी घाटात रस्त्याच्या कडेला ९ जण उभे असून त्यांच्याकडे टेम्पो (एम. एच. १७, सी. व्ही. १०८४) आहे. त्यांच्याकडे लोखंडी कटावनी, कटर, कुन्हाड, लाकडी दांडे, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर पुडी असे साहित्य असून ते चोर असण्याची शक्यता आहे. असा फोन डायल ११२ क्रमांकावर वरंवडी येथील एकाने केला.
याबाबत पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संजय सोनवणे, सहायक फौजदार पाटोळे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिघांना पकडण्यात आले, त्यांनी त्यांच्या साथीदारांची नावे सांगितली.
दरोडा टाकण्यासाठी आणलेले साहित्य जप्त
पानोडी-वरंवडी घाटात रस्त्याच्या कडेला ९ जण उभे होते. तेथून जात-येत असलेल्या प्रवाशांची लूटमार करण्याचा त्यांचा उद्देश असून त्यांच्याकडे हत्यारे होती.
त्यातील तिघांना पोलिसांना पकडले, यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. उर्वरित सहा जण पळून गेले. टेम्पो, दरोडा टाकण्यासाठी असलेले साहित्य, दोन मोबाइल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.