Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत.
राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे ९ हजार बसेस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत. यात अहिल्यानगर जिल्ह्यातूनही ४६५ बसेस निवडणूक कामासाठी पुरविल्या जाणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे.
एसटी स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी बघायला मिळत आहे. एकीकडे प्रवासी सेवेसाठी मोजक्याच बस उपलब्ध आहेत, त्यामुळे दोन दिवस एसटी प्रवासी वाहतुक सेवा विस्कळीत होत अससल्याची संधी साधत खासगी वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवाशांची चांगलीच लूट केली आहे. बस नसल्याने मोठ्या प्रमाणात भाडे वाढ करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणूक कार्यालयाला मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली होती . त्यानुसार एसटी महामंडळाने ४६५ बसगाड्या निवडणूक साहित्य तसेच कर्मचारी केंद्र स्थळावर पोहोच करण्यासाठी पाठवल्या आहेत.
निवडणूक कामासाठी एसटी महामंडळाने ३१ विभागांतून २०० ते ६०० बस आरक्षित केल्या आहेत पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची मागणी असून सुमारे ६०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधून सुमारे ५११, सोलापूर ४९०, अहिल्यानगर ४६५, सातारा ४४९, कोल्हापूरमधून ४५३ बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक बसगाड्या वापरण्यात येणार आहेत. यातून एसटी महामंडळाला दोन दिवसांसाठी प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळतील, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तर दुरीकडे मात्र निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने शहरी व ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांना बसेस नसल्यामुळे गैरसोय झाली होती. वेळेवर बस नसल्याचा फटका प्रवाशांना बसल्याने खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागला.