Ahilyanagar News : राज्यातील सुमारे ६२२ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीसारखीच राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे. असे गृहीत धरून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र सध्या तरी राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड होणार आहे.

त्यामुळे या निवडणूक कधी होतील याबाबत सांगता येत नाही. दरम्यान आगामी २२ जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी आदींचा विचार करता निवडणूक तयारीसाठी तीन महिने कमी पडतात. त्यानंतर मार्च, एप्रिलमधील शाळांच्या परीक्षा आणि उन्हाळा सुरु होतो.

त्यानंतर पावसाळा सुरु होतो त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घ्यायच्या की पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल. पण, त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेऊन निवडणुका घेण्याचा मार्ग सुकर करण्याची गरज असल्याने आता २२ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे.परंतु सध्या तरी या निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाही. कारण या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढील तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

या तयारीत प्रामुख्याने महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल.

त्यामुळे सध्या तरी महानगरपालिकांसह नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही.