Ahilyanagar News : शेवगाव तालुक्यातील शेअर्स मार्केटच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या इन्व्हेस्टिंग डॉट कॉम, शिवटेक सोलुशन, वेल्थ मेकर व एन. मास्टर आदी कंपन्यांच्या ट्रेडर्सवर एम.पी.आय.डी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी एम.पी.आय.डी. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशनसमोर अमरण उपोषण करण्यात आले होते. हे उपोषण १५ ऑगस्ट रोजी शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा गट) अॅड. अविनाश मगरे यांच्या मध्यस्थीने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या हस्ते सोडवण्यात आले होते.
याप्रसंगी तहसीलदार प्रशांत सांगडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे उपस्थित होते. खैरे यांनी या ट्रेडर्सवर एम.पी. आय.डी. लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी वेगवेगळ्या ट्रेडर्सच्या विरोधात गुन्हे दाखल केले.
शेवगाव तालुक्यातील जनतेच्या हजारो कोटी रुपयांची शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली लूटमार केल्याचा आरोप असणारे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम. चे गदेवाडीचे अक्षय मेशोक इंगळे, अविनाश मेशोक इंगळे, शिवटेक सोलुशन कुरुडगावचे ट्रेडर ज्ञानेश्वर कवडे, भाऊसाहेब कवडे, वेल्थ मेकर नजीक बाभूळगावचे ट्रेडर वंजारी रामेश्वर शिवाजी, ज्ञानेश्वर शिवाजी वंजारी व शिवाजी कचरू वंजारी, एन.के. मास्टर कुरुडगावचे ट्रेडर नारायण रामनाथ काळे, किरण रामनाथ काळे इत्यादी ट्रेडर्सवर एम.पी.आय.डी. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आरोपींनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता; न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांचा तुरुंगात मुक्काम वाढवला आहे. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्व गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.