Ahilyanagar News : सध्या ग्रामीणभागात भरणाऱ्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात भुरटे चोरटे मौल्यवान वस्तू, मोबाइल आदी लंपास करतात. चोरट्यांच्या या उपद्रवामुळे मात्र बाजारात येणाऱ्या नागरिकांची दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे.

तर आठवडे बाजारात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी वनागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी राहाता पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी गुरुवारी आठवडे बाजारात पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन मोहीम राबवली.

राहाता शहरात प्रत्येक गुरुवारी वीरभद्र मंदिरासमोर व पाठीमागील बाजूस तसेच साकुरी हद्दीत आठवडे बाजार भरतो. या आठवडेबाजारासाठी परिसराच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने विविध प्रकारचे साहित्य भाजीपाला, कपडे, खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी येतात.

या परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी, फळांच्या बागा तसेच शिर्डी व राहाता परिसरात बांधकाम व्यावसायिक, हॉटेल, लॉजिंग मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

परिणामी आठवड्यात बाजारात विविध राज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले मजूर तसेच परिसरातील गावातील महिला व पुरुष गुरुवारी आठवडे बाजारात खरेदीसाठी येतात.

याच गर्दीचा फायदा घेत इतर तालुक्यातील चोरटे प्रामुख्याने लहान वयातील मुले व महिला बाजारात येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल व पाकीट तसेच महिलांच्या पर्स व मौल्यवान वस्तू चोरी करतात.

प्रत्येक गुरुवारी तीन ते चार मोबाईल व पर्स तसेच पाकीट चोरी गेल्याची तक्रार राहाता पोलीस ठाण्यात दाखल होतात . राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पुणतांबा, राहाता व इतर ठिकाणच्या आठवडे बाजारात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत स्वतः सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी आठवड्यात बाजारात गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे.