Ahilyanagar news : असे म्हणतात की खरे कधी झाकले जात नाही कधी ना कधी ते सर्वांसमोर येते, या म्हणीची प्रचिती नुकतीच आली आहे. विशेष म्हणजे म्हणजेच पत्नीनेच एका अल्पवयीन मुलीसोबत पुनर्विवाह करणाऱ्या आपल्या पतीसह इतर नातेवाईकांना जेलची हवा खाण्यास पाठवले आहे.

पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील एका अल्पवयीन मुलीचा सप्टेंबर २०२३ मध्ये बालविवाह झाला असून या बालविवाह प्रकरणी चौदा महिन्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मोहरी ग्रामपंचायतचे ग्रामविकास तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी कृष्णा खटावकर यांच्या फिर्यादीवरून मुला मुलीचे आई-वडिल, मामा व अल्पवयीन मुलीचा पती अश्या सहा जणांवर बालविवाह केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

पतीने अल्पवयीन मुलीबरोबर पुनर्विवाह केला म्हणून पत्नीने मोहरी येथील बालविवाह प्रतिबंध समितीकडे या बालविवाहाची लेखी तक्रार केली होती. याची दखल घेऊन समितीने चौकशी करत मुलीच्या आई-वडिलांचे जबाब घेतले होते. त्यामध्ये मुलीचा विवाह झाला नसून ती परगावी शिकायला आहे, असा जबाब दिला होता.

त्यानंतर लग्न झालेल्या अल्पवयीन मुलीला ग्राम बालसंरक्षण समिती (मोहरी ता. पाथर्डी) यांचे समोर दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी समोर हजर केले. त्यावेळी मुलगी व तीचे मामा यांच्याकडे लग्नाबाबत चौकशी केली असता त्यांनी लग्न झाले नसलेचे जबाब दिला. तसेच समितीमार्फत स्थानिकांची चौकशी केली.
परंतु मुलीचा विवाह झाले बाबत ठोस पुरावा उपलब्ध न झाल्याने बालविवाह घडला नसल्याचा दि.१२ ऑक्टोबर २०२३ ला अहिल्यानगर येथील बालकल्याण समितीकडे चौकशी अहवाल पाठवण्यात आला.

दरम्यान पहिल्या पत्नीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देखील तक्रारी अर्ज केला. त्या अर्जाची पाथर्डी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी चौकशी करून बालविवाह झाला नसल्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १५ जुलै २०२४ ला सादर केला.

त्यानंतर दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिल्या पत्नीने पुन्हा अहिल्यानगर पालकल्याण समितीचे अध्यक्ष व सचिव व यांचेकडे लेखी तक्रार केली. त्यावर याघटनेसंदर्भात विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास विभाग, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेची सखोल चौकशी सुरु करण्यात आली.

चौकशी दरम्यान दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी बालविवाह झाल्या बाबतचे फोटो आणि व्हिडिओ विभागीय उपआयुक्त यांच्यासमोर सादर केले. त्यामध्ये मोहरी येथील एका मुलीचा अल्पवयीन वयामध्ये विवाह झाल्याचे निष्पन्न झाले. विभागीय उपायुक्त यांनी गुन्हा दाखल करायचे आदेश दिल्यानंतर दि. १४ डिसेंबर २०२४ शनिवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.