Ahilyanagar News : विधानसभेत एकीकडे राज्यभरात महायुतीच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या सभा सुरू होत्या. जिल्ह्यातही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांच्या सभा झाल्या.

मात्र, अहमदनगर शहर मतदारसंघात महायुतीच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. आमदार जगताप यांच्या यंत्रणेचे नियोजन, राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवर असलेले संघटन व भाजप, शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची साथ यावरच तिसऱ्यांदा विजय मिळवत आमदार संग्राम जगताप यांनी हॅटट्रिक केली.

अहमदनगर शहर मतदारसंघात मध्य शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातहोता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आमदार जगताप यांना या भागातून फारशी साथ मिळत नव्हती.

त्यात केडगाव उपनगर भागात जगताप यांना मोठा विरोध असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु या भागातही जगताप यांनी चार हजारांचे मताधिक्य घेतले. मतदानाच्या एक दिवस आधी शहरात सुप्त लाट असल्याच्या चर्चाही झडल्या. निकालानंतर ही केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुकुंदनगर, झेंडीगेट, कोठला भागात याही निवडणुकीत महायुतीला साथ मिळाली नाही. या भागातून विरोधी उमेदवार अभिषेक कळमकर यांना आठ ते दहा हजारांचे मताधिक्य मिळाले.

मात्र, हिंदुत्ववादी मतदारांमध्ये झालेली जागृती, लाडकी बहीण योजनेमुळे संपूर्ण शहरातून मिळालेला प्रतिसाद व त्यातून वाढलेल्या मतदानामुळे इतर भागातून मताधिक्य जगताप यांना मिळाले.

विशेषतः शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मध्य शहरातूनही जगताप यांना साथ मिळाली. तसेच, चार हजारांचे मताधिक्य मिळाल्याने केडगाव उपनगरातही त्यांचे वर्चस्व असल्याचे निकालातून समोर आले.

तसेच तोफखाना, चितळे रस्ता, नालेगाव अशा सर्वच भागातून त्यांना साथ मिळाली. बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील संपूर्ण परिसर, कल्याण रोड, स्टेशन रस्ता, बुरुडगाव रस्ता, भिंगार परिसरातही त्यांनाच मताधिक्य मिळाले.