Ahilyanagar News : तुम्ही जमीन नावावर करुन घेतली, मात्र त्याचे काहीच पैसे दिले नाहीत, असे म्हणाल्याचा राग आल्याने एक महिलेने मुलाच्या डोक्यात दगड मारुन त्याला जखमी केले. तसेच शिविगाळ करत आमच्या नादी लागले तर तुमचा एकाएकाचा काटाच काढु, अशी धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. याबाबत पोलिसांनी हसीना सय्यद या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की रेश्मा यासीन शेख (वय ३६ वर्षे, रा. तनपुरेवाडी रोड, विटभट्टीजवळ, राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रेश्मा शेख या दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मानोरी येथे त्यांच्या कुटुंबासह एका कार्यक्रमात गेल्या होत्या.
त्या कार्यक्रमाला रेश्मा शेख यांची नणंद हसीना अकबर सय्यद व तीचे पती अकबर बाबुभाई सय्यद (दोघे रा. टाकळिमीयाँ, ता. राहुरी) हे तेथे आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर रेश्मा शेख यांचे पती अकबर सय्यद यांना म्हणाले की, तुम्ही कडा आष्टी येथील जमीन नावावर करुन घेतली.
त्या ठिकाणी मी तुम्हाला सह्या दिल्या; परंतु तुम्ही मला काहीच पैसे दिले नाही. असे म्हणाल्याचा राग आल्याने हसीना अकबर सय्यद हिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तीने रेश्मा शेख यांचा मुलगा रिजवान शेख याच्या डोक्यात दगड मारुन त्याला जखमी केले.
आमच्या नादी लागले तर तुमचा एकाएकाचा काटाच काढु, अशी धमकी दिली. घटनेनंतर रेश्मा यासीन शेख यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी हसीना अकबर सय्यद, अकबर बाबुभाई सय्यद (दोघे रा. टाकळिमीयाँ, ता. राहुरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.