Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर व उपनगर परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरु असून रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसाही घरफोड्या, चेन स्नॅचिंग असे गुन्हे घडत आहेत.

त्यात आता ग्रामीण भागात देखील चोरटयांनी आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान वाढत्या चोऱ्या, घरफोड्या रोखण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याने गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि वारंवार गुन्हे करत आहेत.

अनेक ठिकाणी चोरी करण्यासाठी सध्या चोरटे नागरिकांना गुंगी येण्यासाठी विविध औषधी स्प्रेचा देखील वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा स्प्रेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो.

या वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागात तर परिसरातील नागरिकच रात्रीच्यावेळी आळीपाळीने गस्त घालतात. त्यात चोरटे चोरी करताना प्रत्येकवेळी वेगवेगळे फंडे वापरतात त्यामुळे अशा चोरीचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते.

नुकतीच संगमनेर तालुक्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला असून एकाच दिवशी चार ठिकाणी चोरी करून मोठा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे मंगळवारी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घालत एका किराणा दुकानासह तीन घरे फोडली. यावेळी चोरी करताना स्प्रे मारल्याने अनेकांना उलट्यांचा त्रास झाला.

संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर रामभाऊ गडाख यांचे जनरल स्टोअरमधील थंडपेय, किराणा चोरून नेला. त्यांच्या घरात उचकापाचक करत सोने, रक्कम लंपास केली.

सोमनाथ सखाहरी गडाख यांच्या घरी दोन तोळे सोने, चार हजार रुपये रोख पळविले. सुभाष विठ्ठल सोनवणे यांचे २५ हजार रूपये रोख, एक तोळे सोने, किराणा असा ऐवज लांबविला.

चोरांनी चोरी करताना स्प्रे मारल्याने अनेकांना जाग आली नाही. स्प्रेमुळे अनेकांना उलट्यांचा त्रास झाल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.