Ahilyanagar News : अनेकांनी शेती करताना शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायास आपल्या स्वप्नांचा एक आधार म्हणून पाहिले; मात्र सध्या या व्यवसायावर आलेल्या संकटांनी शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तडे दिले आहेत.
वाढत्या खर्चाचा डोंगर, दुधाला मिळणारा अपुरा भाव आणि सरकारकडून दुर्लक्ष अशा अडचणींनी शेतकरी आणि दुध व्यावसायिकांना मोठ्या खर्चात ढकललं आहे. चाऱ्यापासून औषधांपर्यंत प्रत्येक बाबतीत संघर्ष वाढला असताना, या क्षेत्राला आधार देणारा कोणीही दिसत नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हा व्यवसाय करणारा उत्पादक आता अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
दुधाच्या उत्पादनासाठी होणारा खर्च झपाट्याने वाढत असताना दुधाला मात्र बाजारपेठेत समाधानकारक दर मिळत नाही. सध्या दुधाचे प्रतिलिटर दर कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
जनावरांच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधांचे दर मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. लसीकरण, संसर्गजन्य रोगांवरील उपचार यासाठी खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. पाण्याची टंचाई आणि शेतीसाठी लागणाऱ्या भांडवली खचर्चामुळे शेतकऱ्यांना चारा उत्पादनातही अडचणी येत आहेत.
चाऱ्याची उचल करण्यासाठी होणारे कष्ट आणि यावर होणारा खर्च, यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुध व्यवसायात आधुनिक यंत्रसामग्रीचा उपयोग मर्यादित प्रमाणात होत आहे. दुध गोळा करणे, प्रक्रिया करणे आणि विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर हाताळणीसाठी लागणाऱ्या यंत्रणा महागड्या असल्याने छोटे व्यावसायिक मागे पडत आहेत.
शेतकरी अनेकदा सरकारकडून अनुदानाची अपेक्षा करतात, मात्र दुध व्यवसायासाठी पुरेशी आर्थिक मदत मिळत नाही. दुध उत्पादनाला सबसिडी, चाऱ्यावर अनुदान आणि औषधांवरील सवलतीची तातडीची आवश्यकत्ता आहे.
पशुखाद्याचे दरही झपाट्याने वाढले आहेत. यामुळे दुध उत्पादनाचा खर्च भरमसाट वाढला आहे. अनेक शेतकरी जनावरे विकण्याच्या विचारात आहेत, ज्यामुळे व्यवसायाला अधिक हानी पोहोचत आहे.
जनावरांच्या आरोग्यासाठी लागणारे नियमित तपासणी खर्च, दवाखान्याच्या सुविधांचा अभाव आणि खासगी डॉक्टरांच्या वाढत्या शुल्कामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
एकूणच, दुध उत्पादनासाठी लागणारा खर्च जसे कौ, जनावरांचा खरेदी खर्च, चारापाणी, औषधे, कामगार खर्च, यांत्रिकीकरण आणि वाहतूक यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा विचार करता, व्यवसाय तोट्यात जात आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.