Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा हा मातब्बर साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. साखर कारखाने आणि संलग्न विविध संस्थांच्या माध्यमातून मतदार कारखानदारांची पिढ्यानपिढ्या जोडलेले असतात. त्यामुळे त्यांच्याशी लढा देणे सामान्य उमेदवाराला सहज शक्य होत नाही, असा आतापर्यंतचा समाज होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तो फोल ठरला. जिल्ह्यातील बारा पैकी सहा मतदारसंघात साखर सम्राटांचा पराभव झाला आहे. त्यामुळे यापुढे मतदारांना गृहीत धरणे चांगलेच महागात पडते हे समोर आले आहे.
संगमनेर तालुक्यामध्ये ज्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे, ते राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत पराभूत होतील असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. तालुक्यातील त्यांचे प्रस्थ पाहता भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करणारे अमोल खताळ या सामान्य कार्यकार्याला अवघ्या २० दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश देत थेट उमेदवारी देण्यात आली.
विशेष म्हणजे आतापर्यंत अमोल खताळ यांचे संगमनेर तालुक्यात स्वतःचे असे वेगळे कुठलेही मोठे राजकीय काम नव्हते. दुसरीकडे शिवसेनेतील फुटी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तेथे कार्यकर्ते देखील बोटावर मोजण्याइतकेच होते. असे असताना भाजपातून आयात करून ऐनवेळी खताळ यांना उमेदवारी देण्यात आली.
त्यामुळे थोरात यांचा विजय पक्का मानला जात असल्याने ते देखील याच भ्रमात होते. त्यामुळे बाळासाहेब थोरात या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असे सर्वच राजकीय विश्लेषक सांगत होते. मात्र विखे पाटील यांनी खताळ यांच्या माने ताकद उभी केली. विखे पाटील व राज्यातील महायुती सरकारचे काम, एवढीच काय ती जमेची बाजू दिसत होती.
विविध पक्षांचे सर्वेक्षण, माध्यम समूहाचे सर्वेक्षण त्याच दिशेने पुढे होते. घडले मात्र उलटेच . मतदारांना गृहीत धरणे थोरात यांना महागात पडले. कधी नव्हे तो एका सामान्य कार्यकर्त्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सहकारातील एका मोठ्या आणि मातब्बर नेत्याचा सामान्य कार्यकर्त्याने केलेला पराभव राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे .
अकोले मतदारसंघात वैभव पिचड हे इतर दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत ताकदवान उमेदवार. गेल्यावेळी सरकार विरोधी लाटेत त्याचा पराभव झाला. मात्र यंदा ते विजय मिळवतील अशी त्यांच्या समर्थकांना खात्री होती, मात्र किरण लहामटे, अमित भांगरे या दोघांनी त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली. संगमनेर प्रमाणेच अकोले तालुक्यात देखील साखर कारखानदार फेल झाले.
नेवासा तालुक्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठीशी तर दोन साखर कारखान्यांची ताकद होती. दोन साखर कारखान्यांची ताकद पाठीशी असताना देखील विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे अशी मत विभागणी असताना गडाख यांचा पराभव झाला. मतदारांना गृहीत धरणे त्यांना महागात पडले.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात तर तिन्ही साखर कारखानदार रिंगणात होते. यात विद्यमान आमदार मोनिका राजळे, महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे, अपक्ष उमेदवारी केलेले चंद्रशेखर घुले या प्रत्येकाकडे साखर कारखान्याचे पद तसेच इतर संस्थाही सोबतीला आहेत.
मात्र एवढे असूनही राजळे यांना मिळालेला विजय हा घुले आणि ढाकणे यांना अंतर्मुख करणारा आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे हे देखील साखर कारखानदार म्हणून सुपरिचित आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याशी त्यांची लढत झाली. त्यात तनपुरे पराभूत झाले.अशीच स्थिती श्रीगोंदा मतदारसंघात अनुराधा नागवडे आणि राहुल जगताप यांची झाली.