Ahilyanagar News : शाळांचे जवळपास अर्धे शैक्षणिक सत्र संपत आल्यानंतर आता आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबवणार आहे. मात्र याचा फटका पालकांना बसला आहे. त्यामुळे या प्रवेशप्रक्रिये बाबत पालक नाराज आहेत.

गेल्या वर्षी विविध कारणांनी लांबलेल्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया २०२५-२६ सोमवारपासून सुरवात होणार आहे.

त्यानुसार सर्व विनाअनुदान प्राप्त शाळांची ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. दि. १० मार्चपर्यंत शाळांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

दरवर्षी आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहते. अर्धे शैक्षणिक सत्र संपते, तरी प्रवेशप्रक्रिया सुरूच राहिल्याने आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होत नाही. मागील शैक्षणिक वर्षात आरटीई प्रक्रिया बंद करण्यासाठी शासनस्तरावरून अनेक प्रयत्न झाले.

त्यात विनाअनुदानित इंग्रजी माध्यमात प्रवेश प्रक्रियेऐवजी अनुदानित जिल्हा परिषद आणि मराठी माध्यमाच्या शाळांसाठी ही प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न शासनाकडून प्रयत्न करण्यात आला.

मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यम, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यंदा आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी होईल.

काही नवीन शाळा, वाढलेल्या वर्ग तुकड्या आणि त्यातील वाढलेल्या प्रवेशाच्या जागांची माहिती काही दिवसांच्या आत जमविण्याचे नियोजन आहे. यानंतर लगेचच मुलांच्या प्रवेशासाठीच्या नोंदणीला सुरवात होईल आणि मुदतीत ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.