Ahilyanagar News : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी ३७६५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून २१ हजार ५७४ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने राखीव सुरक्षा दलाच्या १६ कंपन्यांसह साडेसात हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड नियुक्त राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिली.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, माहिती अधिकारी अमोल महाजन आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यातील या बारा विधानसभा मतदारसंघात एकूण ३७ लाख ८३ हजार ९८७ महिला-पुरुष व इतर असे मतदार आहेत.

प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, व्हिलचेअर सुरक्षा व्यवस्था, उष्माघातापासून संरक्षणासाठी औषधे, बैठक व्यवस्था, सावलीसाठी मंडप उभारणी, पाळणाघर आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे.

मतदान साहित्याबरोबर मेडीकल कीट ही उपलब्ध करून दिला जाणार आहे. मतदान अधिकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. १२ हि विधानसभा मतदारसंघात आज मंगळवारी (दि.१९) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम मशिनसह मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे.

मतदान साहित्य प्राप्त करून घेतल्यानंतर मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर मुक्काम करणार आहेत. आयोगाचे निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय वाहतूक आराखडा तयार करण्यातआला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. ५५९ मार्गावर ४६४ बसेस, १११५ जीप, १२५ मिनी बसेस, १०७ कुझर, ४१ कार्गो आणि १८ आयशर अशी वाहने तैनात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

असा असेल पोलिस बंदोबस्त

मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ३ हजार ६९८ पोलीस जवान, ३ हजार ६२३ होमगार्ड आणि राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या १६ कंपन्या तैनात आहेत. ३६ पीआय, एपीआय आणि पीएसआय दर्जाचे १७३ अधिकारी, १० डीवायएसपी तसेच २ अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियुक्त आहेत.