Ahilyanagar News : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात शनिवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. एक हजार रुपयांनी भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

नेप्ती उपबाजारात ६३ हजार २७७ कांदा गोण्यांची आवक होऊन शेतकऱ्यांना सरासरी १ हजार ते ४ हजार २०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.

मागील आठवड्यात पाच हजार दोनशे रुपये भाव मिळाला होता. त्याच कांद्याचा भाव साडेतीन हजार ते चार हजार झाला. एक हजार ते बाराशे रुपयांनी कांद्यात घसरण झाली.

लिलावात एक नंबर कांद्यास चार हजार दोनशे रुपये भाव मिळाला. मध्यम २ हजार ७०० ते तीन हजार ५०० रुपयाचा भाव मिळाला. गोल्टीस १८०० ते २७०० रुपये भाव मिळाला.

जोड तसेच हलक्या प्रतीच्या कांद्यास १ हजार रुपये ते १८००रुपयांचा भाव मिळाला. काही मोजक्या २६ कांदा गोण्यास ४ हजार ५०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

देशभर कांद्याचे भाव वाढू लागताच केंद्र सरकारने अफगाणिस्तानचा कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा बॉर्डरवर येताच अहिल्यानगर जिल्ह्यातील भाव कोसळले आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत शनिवारी (दि.२८) अहिल्यानगर , घोडेगाव येथे बाजारात कांद्याचे भाव प्रतिक्विंटल बाराशे ते एक हजार रूपयांनी घसरले आहेत.

एकीकडे केंद्र सरकारने निर्यात शुल्क ४० टक्क्यांहून २० टक्के केले आहे. मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानहून आयात केलेला कांदा निशुल्क बाजारात विक्रीस येऊ लागला आहे.

त्यामुळे त्याचा परिणाम येथील कांदा भावावर झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये भाव कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने बाजारात कांदा आवक वाढली.