Ahilyanagar News : मागील दोन वर्षांपूर्वी हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली करत लोकसंख्या शास्त्रानुसार, लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा कमी व्हायला नको. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोनपेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्ये जन्माला घालावीत, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते. त्यावर विविध स्तरातून टीका केली होती.

सध्या अनेक तरुण जोडपी एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. लोकसंख्या घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की, जेव्हा जन्मदर २.१ च्या खाली येतो तेव्हा पृथ्वीवरून मानव नष्ट होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो.

ही परिस्थिती उद्भवल्यास अनेक भाषा, संस्कृती संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होतो. देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये ठरविण्यात आले. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ पेक्षा कमी नसावा. आमच्यासाठी दोन-तीन मुले असणे गरजेचे आहे. कारण समाजाचे अस्तित्व राखण्यासाठी हे गरजेचे आहे.असे देखील ते म्हणाले होते.

दरम्यान आता परत एकदा लोकसंख्याबाबत भागवत यांच्या त्या विधानाचा धागा पकडून ग्रामीण भागातील कीर्तनांमध्येही कीर्तनकार, महाराज मंडळी हिंदू धर्मातील लोकसंख्यावाढीबाबत बोलू लागली आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे झालेल्या कीर्तन सेवेत बोलत असताना गुलाबराव करुंजुले महाराज म्हणाले की, सध्या हिंदूची लोकसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान अर्धा डझन मुले जन्माला घालावीत. ही सर्व मुले वडापाव खाऊन जगतील. जगण्याची चिंता करू नका. कोणी मरणार नाहीत.

मला एकूण चार मुले आहेत. सुरुवातील मी मांसाहारी होतो, त्यावेळी दोन मुले झाली. तो आहार खराब होता, त्यामुळे ती मुलेही देखील तशाच विचाराची झाली. नंतर मी शाकाहारी झालो.

त्यानंतर परत दोन मुले झाली. ती मुले मात्र चांगल्या विचारांची झाली. त्यामुळे चांगल्या विचारांची, सद्गुणी मुले होण्यासाठी शाकाहारी आहार घेतला पाहिजे. असा अजब सल्ला देखील करूंजुले महाराजांनी दिला आहे .