मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे मुलीच्या विवाहानंतर नवरी मुलीची सासरी पाठवण करून मोटारसायकलने घरी परतत असताना झालेल्या अपघातात पित्यासह काकाचा मृत्यू झाला.

मिरजगाव – गुरवपिंप्री या रस्त्यावरून गुरवपिंप्रीकडून मिरजगावच्या दिशेने भरधाव येत असलेल्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील बाळासाहेब विश्वनाथ सूर्यवंशी (वय ५३, रा.गुरवपिंप्री, ता.कर्जत व दिनेश सदाशिव कागदे (वय ४०, रा. रामनगर, जि. इंदौर (राज्य मध्यप्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला.

हा अपघात मंगळवार दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान घडला. मुलीच्या विवाहानंतर काही तासांनीच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे मिरजगाव गुरवपिंप्री परिसरावर शोककळा पसरली.

मिरजगाव येथे मंगळवारी येथील पाटील मंगल कार्यालयात गुरवपिंप्री येथील शेतकरी बाळासाहेब सूर्यवंशी यांची कन्या वैष्णवी हिचा शुभविवाह केदार जगताप (रा. टाकळसिंग, ता. आष्टी) यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला.

लग्न सोहळ्यातील सर्व विधी पूर्ण करून आपल्या मुलीला सासरी पाठवणी केल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान वधुपिता बाळासाहेब सूर्यवंशी व लग्नासाठी इंदौर येथून आलेले बाळासाहेब यांचे साडू वधूचे काका दिनेश कागदे हे मोटारसायकलवरून गुरवपिंप्री येथे आपल्या घराकडे जात होते.

मिरजगाव – गुरवपिंप्री रस्त्यावर खेतमाळस वस्ती या शिवारात त्यांच्या क्र. एम.एच. १६ बी.एल ९२८५ या मोटारसायकलला समोरून भरधाव वेगाने आलेल्या जॉनडिअर कंपनीच्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा दुदैवी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. मिरजगाव येथील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

सदर घटनेबाबत रवींद्र विश्वनाथ सूर्यवंशी (रा.गुरवपिंप्री, ता. कर्जत), यांनी मिरजगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. बी. आय. गव्हाणे हे करीत आहेत.