Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : पारनेर ढगाळ हवामान, हवेत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आर्द्रता यामुळे निर्माण झालेल्या असह्य उकाड्याने पारनेर तालुक्यातील नागरिक शनिवारी दिवसभर हैराण झाले. त्यातच दिवसभर वीज गायब असल्याने नागरिकांच्या हालाला पारावार राहिला नाही.

तब्बल अडीच महिने उन्हाळ्याचा कडाका सोसल्यानंतर गेल्या आठ दिवसांत तालुक्यातील विविध ठिकाणी, वेगवेगळ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता.

पारनेरकरांचा हा सुखद अनुभव मात्र फार काळ टिकला नाही. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही प्रमाणात वारे वाहू लागल्यावर पारनेरकरांची हैराण करणाऱ्या उकाड्यातून सुटका झाली.

दरम्यान, शुक्रवारी (१७ मे) तालुक्यात दिवसभर ढगाळ आणि पावसाळी वातावरण होते. मोठा पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील उष्णता बाहेर पडल्याने उकाड्यात भर पडली. शनिवारी (१८ मे) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.

वारा पूर्णपणे थांबला होता. झाडाचे पानही हलत नव्हते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ५२ टक्क्यांपर्यंत वाढले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या उकाड्याने तालुकावासीय हैराण झाले होते.

त्यातच विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी सुपे वीज उपकेंद्रातून तालुक्याच्या विविध भागात होणारा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तब्बल नऊ तास वीज नसल्याने आधीच उकाड्याने हैराण झालेल्या पारनेरकरांच्य हालाला पारावार राहिला नाही.

दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारी नगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील,

असा अंदाज वर्तवला होता. मात्र हा अंदाज पूर्णपणे चुकला. वारे बंद असल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागला.

वीजपुरवठा कधी सुरळीत होणार

वीज वितरण कंपनीने विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत राहणार असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केले होते.

दुपारनंतर वीज पुरवठा संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. वीज पुरवठा नेमका कधी सुरळीत होणार याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडे माहिती नव्हती.