Maratha reservation : राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असून, ४ जूनपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिला.
मंगळवारी (दि.१४) सकल मराठा समजाच्या वतीने टी. व्ही. सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अयोजित शोभायात्रेत सहभागी झालेल्या जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीची धामधूम लवकरच संपणार आहे. आपण या निवडणूक प्रक्रियेत सहभागी नव्हतो, त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही. मात्र, मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. ८ जून रोजी नारायणगड येथे मराठा समाजाची जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी आपण ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहोत.
सरकारमधील काही लोक माझ्यावर बिनबोभाट आरोप करत आहेत. त्यामध्ये माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले नव्हते, मात्र मराठा आंदोलनामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात मुक्काम करावा लागला. हे मराठ्यांच्या एकजुटीने घडवले असून, मराठा समाजाचा आता दोन्ही सरकारला धाक वाटत आहे. त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेण्यापासून कोणीही रोखणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
८ जून रोजी नारायणगड येथे होणाऱ्या अतिविराट सभेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, १४ ऑक्टोबर २०२३ मध्ये अंतरवाली सराटीत झालेल्या सभेवेळी राज्यातून आलेल्या मराठा बांधवांना अपुऱ्या जागेमुळे सुविधा देता आल्या नाहीत. त्यामुळे नारायणगड येथे आता सभेचे आयोजन करावे लागले आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या ठिकाणाची पहाणी करण्यासाठी आपण जात आहोत.
पहिल्या ते चौथ्या टप्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीवर मराठा समाजाच्या मतांचा किती परिणाम झाला? या प्रश्नावर त्यांनी आपण या प्रक्रियेतच नव्हतो त्यामुळे त्यावर काही बोलणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, राज्यातील एकजूट झालेल्या मराठा समाजाचा सरकारला धाक वाटत आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी राज्यात मुक्काम ठोकल्याचे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा खरे बोलले
माझा राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही, हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठिकाणी सांगितले आहे. ते पहिल्यांदा खरे बोलल्याने त्यांचे आभार मानतो, असा चिमटा जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांना घेतला.