Ahilyanagar News : आजकाल शेती करणे म्हणजे दुय्यम समजले जाते. तसेच शेती म्हणजे एक प्रकारचा जुगारच समजला जात आहे.

कारण जो शेतमाल शेतकरी पिकवतो त्याला भाव मिळेलच असे नाही त्यामुळे अनेकदा मोठ्या काष्ठाने पिकवलेला शेतमाल भाव न मिळाल्याने रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.

मात्र आता याच शेतीला सध्याचा युवा शेतकरी आधुनिकतेच्या युगात शेतीत कामात यांत्रिकीकरणाचा आधार घेत अधिकाधिक तंत्रशुध्द पध्दतीने शेती करताना दिसून येत आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करताना आढळत आहेत.

यापूर्वी सर्व कामे बैलांच्या सहाय्याने केली जात असत याचाच एक भाग म्हणून आता बैलाऐवजी ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जात आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून अनेक शेतकरी शेतातील फवारणीसाठी देखील ड्रोनचा पर्याय वापरताना दिसत आहेत. आता हाच ड्रोन अनेकांना तरुणांचे रोजगाराचे साधन तर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे समोर आले आहे.

आधुनिक पद्धतीने शेती केल्याने या शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न शक्य झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ड्रोनच्या साह्याने आपल्या शेतातकीटकनाशकांची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीमध्ये सुद्धा बचत होताना आढळत आहे.

शेतकरी वर्गाला सुरूवातीपासूनच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. मात्र, आता जिल्ह्यातला शेतकरी हायटेक होऊ लागला आहे.

त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी विविध पिकावर आता ड्रोनद्वारे फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. एक एकर क्षेत्र फवारणीसाठी सरासरी २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागत आहे.

त्यामुळे दिवसभर पाठीवर पंपाचे ओझे घेऊन चालणाऱ्या पंपाच्या फवारणी यंत्राची आता गरज संपली असून केवळ एक एकरसाठी ३० मिनिटात ड्रोनद्वारे फवारणी होत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी आता या ड्रोनव्दार फवारणी करताना आढळून येत आहेत. ड्रोनव्दारे फवारणी केली तर वेळ आणि औषधांची बचत होत असून पन्नास टक्के खर्च शेतकऱ्यांचा वाचत आहे.

शेतकऱ्यांसाठी हे नवीन तंत्रज्ञानअसून आधुनिक पद्धतीने होत असलेली फवारणी पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्या ठिकाणी गर्दी करताना आढळून येत आहेत.

एकीकडे दिवसेंदिवस मजूर मिळणे कठीण झाले आहेत. परिणामी मजूरीचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मात्र आता तंत्रज्ञानामळे शेतकऱ्यांना कामासाठी मजुरांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येणार नसल्याचे दिसत आहे.