Ahilyanagar Breaking : बांधकाम व्यावसायिकाला निर्जनस्थळी नेऊन चाकू हल्ला करत त्यांच्याकडील ५० लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाला. दहा दिवस उलटूनही आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान आचारसंहितेच्या काळात एवढी रक्कम कशासाठी जवळ बाळगली याचीही चर्चा सुरू झाली आहे.

वडगाव गुप्ता येथील बांधकाम व्यावसायिक अशोक शेळके यांच्यावर १५ एप्रिल रोजी शेंडी बायपास रोडवरील डोंगरे वस्ती येथे चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले होते. यासंदर्भात त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शेळके यांनी यासंदर्भात पोलिसांना नुकताच जबाब दिला आहे. त्यात त्यांनी निखिल शिवाजी गांगर्डे व आपले आर्थिक व्यवहार आहेत. गांगर्ड याला दीड कोटी रुपये दिले होते. हे पैसे तो परत देत नव्हता.

त्याने १५ एप्रिल रोजी फोन करून बोलावून घेतले आम्ही दोघे गांगर्डे याच्याच चारचाकीतून शेंडी बायपासच्या दिशेने गेलो. त्यावेळी त्याने चाकूने वार करत आपल्याकडील ५० लाख तसेच सोन्याची चेन व अंगठी घेऊन पसार झाला, असे शेळके यांनी जबाबात म्हटले आहे.

सध्या निवडणुकीची अचारसंहिता लागू आहे. या काळात ५० हजारांहून अधिक रक्कम बाळगता येत नाही. असे असताना शेळके यांच्याकडे एवढी रक्कम आली कुठून आणि रात्रीच्यावेळी ते ही रक्कम घेऊन कुठे जाणार होते, याबाबत साशंकता असून, यादृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत

निवडणूक आयोग चौकशी करणार का?
शेळके यांच्यावर हल्ला झाल्याची घटना होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, अद्यापही आरोपीचा शोध लागला नाही. दरम्यान या पैशाबाबत निवडणूक आयोग चौकशी करणार का? याकडेही लक्ष लागले आहे.