Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख मिळालेली आहे. हा जिल्हा उत्तर महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर याला पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखतात. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. खरेतर क्षेत्रफळाच्या बाबतीत अहिल्यानगर हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे. मात्र याच नगर जिल्ह्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ती म्हणजे नगर जिल्ह्यातील जवळपास 56.5% जमीन रेताड होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक जमीन ही वाळवंटीकरण्याच्या प्रक्रियेत आहेत. यामुळे भविष्यात नगर जिल्ह्यात शेती योग्य जमीनीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. जमिनी जर अशीच रेताड होत राहिली तर रेताड जमिनीत शेती कशी करायची हा मोठा प्रश्न तयार होण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांपुढे एक मोठे संकट उभं राहणार आहे.

विशेष म्हणजे ही आकडेवारी इस्रोच्या अवकाश उपयोजन केंद्राच्या माध्यमातून समोर आली आहे. इस्रोच्या अवकाश उपयोजन केंद्राने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील 64.2% जमीन वाळवंटीकरणाच्या छायेत आहे. म्हणजेच भविष्यात धुळे जिल्ह्यात शेती करणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम होणार आहे. यातून येत्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहणार असे दिसत आहे.

विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याप्रमाणेच अहिल्यानगर जिल्ह्यातही जमीन रेताड होण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे. वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेत अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रश्न आजच ऐरणीवर आला आहे किंवा गेल्या वर्षी मान्सून काळात कमी पाऊस झाला म्हणून हा प्रश्न तयार झाला आहे असे नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागे देखील जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिर्डी मतदारसंघात गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणाचा आणि नगर मतदारसंघात कुकडी कालव्याचा प्रश्न आजही कायमच आहे. नगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. 2019 पासून सुजय विखे पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. याआधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे दिवंगत दिलीप गांधी यांनी केले आहे. म्हणजेच गेल्या दोन टर्ममध्ये सत्ता पक्षातीलच खासदार या मतदारसंघाला लाभले आहेत. पण, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न अजूनही निकाली निघू शकलेला नाही.

जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, पारनेर या भागातील पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे तशीच पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे नागरिकांच्या मागण्या पाहून आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने सिंचनाच्या अनेक योजना मंजूर आहेत. पण या योजना जिल्ह्यात तशाच प्रलंबित असल्याचे दृश्य आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर आहे पण समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी मध्ये पाणी सोडावे लागते. यामुळे नागरिकांमध्ये अन शेतकऱ्यांमध्ये कायमच मोठा रोष पाहायला मिळतो. तथापि जिल्ह्यातील पाण्याच्या संदर्भात योग्य ती उपाययोजना होत नाहीये. एकेकाळी बाळासाहेब विखे पाटील यांनी पाण्याच्या प्रश्नावर व्यापक प्रयत्न केले होते. सध्याच्या जिल्ह्यातील राजकर्त्यांच्या माध्यमातून मात्र तसे व्यापक प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.