Home अहिल्यानगर अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच; ‘हे तिघे’ आहेत इच्छुक, ठाकरे यांनी केली...

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच; ‘हे तिघे’ आहेत इच्छुक, ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडेच राहणार असून, सर्व इच्छुकांनी एकत्रित येवून एक नाव ठरवून मला कळवा, अशा सूचना देत या मतदारसंघातून सामान्य आणि निष्ठावान शिवसैनिकाला आमदार करणार, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ सप्टेंबरला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा मुंबईत घेतला. यावेळी प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुख यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदासंघाच्या आढावाप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, गिरीश जाधव, संतोष गेनाप्पा, अशोक दहिफळे, कुणाल गोसके, दिलदारसिंग बीर, आदींसह पक्षाचे वरिष्ठ नेते माजी खा. विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. अहिल्यानगरमधून गेलेल्या पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर शहर मतदारसंघाबाबतची विस्तृत माहिती मांडली.

या मतदारसंघात २५ वर्षे सलग शिवसेना पक्षाचा आमदार राहिलेला आहे. पक्षाची ताकद मोठी आहे. आजही अहिल्यानगरमध्ये पक्षाचे २०-२२ नगरसेवक असून, ५० ते ६० माजी नगरसेवक आहेत. पक्ष आणि पक्षप्रमुखांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. एवढे नगरसेवक आणि शिवसैनिकांचे जाळे या मतदारसंघात असून,
सर्वजण पक्षाचे निष्ठेने काम करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील बुथरचना कशी आहे, संघटनेचे कामकाज कशा पद्धतीने चालू आहे, याची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर तुमच्यात विधानसभा लढविण्यासाठी कोण-कोण इच्छुक आहात, असाही सवाल केला.

त्यावर जिल्हाप्रमुख प्रा. गाडे, फुलसौंदर, कदम आणि बाळासाहेब बोराटे यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, तुम्ही सर्व इच्छुक एकत्र या आणि एक नाव तुम्ही मला द्या.

आपण त्यास उमेदवार घोषित करू असे सुचवले. यावेळी तुम्ही शहर मतदारसंघाचा सर्व्हे करा, तुम्हाला जो योग्य वाटेल तो उमेदवार तुम्ही जाहीर करा, आम्ही सर्वजण एकदिलाने काम करू आणि पक्षाचा उमेदवार निवडून आणू, अशी ग्वाही यावेळी पदाधिकारी आणि इच्छुकांनी दिली.

मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडेच राहणार असून, येथून सामान्य आणि निष्ठावान शिवसैनिला आपण आमदार करू. त्यासाठी तुम्ही सर्व तयारीला लागा, असे आदेशच ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगर शहर मतदारसंघ शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.