अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीचे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्याने जिल्हा अहिल्यानगर नावाने ओळखला जाईल. नामांतराच्या बाबतीत महायुती सरकारने वचनपूर्ती केली, अहिल्यादेवीचे स्मारकही उभे करू, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
याबाबत पत्रकात मंत्री विखे यांनी म्हटले, की गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत होती. चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही नामांतराच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी देण्याचे विनंतीपत्र दिले होते. यापुर्वी रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर नावाला कोणतेही हरकत नसल्याचे राज्य आणि जिल्हा प्रशासनाला कळविले होते.
केंद्र सरकारने अहिल्यानगर नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. आता सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे नगर जिल्हा उपविभाग नगर तालुकासुद्धा अहिल्यानगर नावाने ओळखला जावा म्हणून राज्य सरकारने राजपत्र घोषित केले आहे. महायुती सरकारने नामांतराच्या दिलेल्या शब्दांची वचनुर्ती केली आता स्मारक उभारणीचे कामही पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऐतिहासिक घटना
पुण्यशलोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाला ३०० वर्ष यंदा पूर्ण होत असताना जिल्ह्याला त्यांचे नाव देता आले, ही ऐतिहासिक घटना असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले