Ahilyanagar News : राज्याच्या काही भागात थंडीची लाट आली असून, रविवारी (दि.१५) सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे ६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. यंदाच्या हंगामातील हे निचांकी तापमान आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे.

दरम्यान, सोमवारीही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

उत्तरेच्या अनेक भागात थंडीची लाट आली आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भाग गारठले आहेत. सायंकाळनंतर थंड वारे वाहत असून, रात्री निचांकी तापमानाची नोंद होत आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई २२.४, सांताक्रुझ १६.३, रत्नागिरी २२, डहाणू १६, पुणे ९, लोहगाव १२.६, जळगाव ७.९. असे होते .

संपूर्ण राज्यात रविवारी हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट आणि कोकणात किचिंत घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दरम्यान वाढत असलेल्या थंडीने गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत आहे. परिणामी, जिल्ह्यात थंडी वाढत चालली आहे. सोमवारी देखील चांगलाच गारठा जाणवत होता. सायंकाळनंतर थंडीची तीव्रता अधिक जाणवते. यामुळे सायंकाळनंतर रस्त्यांवरील वर्दळ तुलनेने काहीशी कमी असल्याचे चित्र शहरात होते.

थंडीचा कडाका वाढल्याने सायंकाळनंतर शहरी भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसत आहेत . लोक घराबाहेर पडताना, विशेषत: सायंकाळनंतर स्वेटर, कानटोपी परिधान करतात . स्वेटर, जॅकेट, कानटोपी, हातमोजे अशी उबदार कपडे खरेदीसह थंडीपासून बचाव करणार्‍या क्रीम, मलम आदींची खरेदी करण्यासाठीही गर्दी वाढत आहे