भातोडी पारगाव ते टाकळी काझी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते पण पावसाळ्यात पावसामुळे रस्त्याचे काम थांबवण्यात आले होते.पण पावसाळा संपून गेला तरीहि अजून रस्त्याचे काम पूर्ण न होता,काम अजूनही अर्धवटच आहे.त्या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण होण्यासाठी नागरिकांकडून बांधकाम विभागाला मागणी होत आहे.
भातोडी पारगाव ते टाकळी काझी दरम्यान रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी ८ दिवसानंतर संघटनेच्या वतीने बांधकाम विभागाच्या कार्यालयात याच रस्त्याची धूळ आणून धूळफेक आंदोलन करण्याचा इशारा जन आधार सामाजिक संघटनेने दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील ४ महिन्यापूर्वी ८ कोटी रुपये निधीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते.पण पावसाळ्यात पावसामध्ये रस्त्याचे काम थांबल्यानंतर अजून पर्यंत काम सुरू झाले नाही.
त्याचे कारण असे होते कि रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे विभागाच्या वतीने तातडीने रस्त्याची उंची वाढवण्यासाठी खडीकरण,मुरुमीकरण करण्यात आले होते.मात्र त्या मुरुमीकरणावरून अवजड वाहनांमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व शेतीची पिके असल्यामुळे या पिकांचे धुळीमुळे नुकसान होत आहे.खडीकरण उघडे पडल्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या टायरने खडे उडून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना लागून नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात.
रस्त्यावरील उघड्या पडलेल्या या खडीमुळे एखादा गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन एखाद्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो.त्यामुळे तातडीने या सर्व बाबीची चौकशी करून या रस्त्यावर तातडीने पाणी मारण्याची व्यवस्था करावी तसेच संबंधित ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे.
या मागणीसाठी बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी के. बी. शेळके यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहबाज शेख, रवी पवार, अशोक बनसोडे, दीपक गुगळे, अमित गांधी आदी उपस्थित होते.