आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवले गेले. मात्र जिल्ह्यातील ५५२ शाळांनी या अभियानात सहभागच घेतला नाही.

महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा दोनमध्ये नगर जिल्ह्याला पुणे विभागात दोन पुरस्कार मिळाले.शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गटात संवत्सर (ता. कोपरगाव) जिल्हा परिषद शाळेला प्रथम, तर इतर व्यवस्थापन गटात राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला द्वितीय पुरस्कार मिळाला.

शालेय शिक्षण विभागाद्वारे संपूर्ण राज्यभर राबविले गेलेले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमासह विद्यालयातील पायाभूत सुविधा, शासन ध्येयधोरण अंमलबजावणी, शैक्षणिक संपादणूक व गुणात्मक वाढ या प्रमुख घटकांवर आधारित एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम व निकष निश्चित करून राबविण्यात आले.

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातून सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ११ लाख विद्यार्थी, तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते.

या अभियानात राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर ५१ ते १ लाखापर्यंत बक्षिसांची तरतूद होती. नगर जिल्ह्यात संवत्सर जिल्हा परिषद शाळेला पुणे विभागात प्रथम २१ लाखांचे बक्षीस मिळाले.

दुसरीकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम व पुणे विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.संवत्सर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांकाचे २१ लाखांचे पारितोषिक मिळाले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.