महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून आज निवडणुकीचा निकाल लागणार असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या ड्युटीसाठी महाराष्ट्रातलया महामंडळाच्या बसेसचा वापर करण्यात आला होता.

निवडणूक कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी प्रवास असो किंवा ईव्हीएम मशिन्स किंवा निवडणुकीची इतर साहित्याची ने आण करण्यासाठी या महामंडळाच्या बसेसचा वापर करण्यात आला होता.

दरम्यान कोपरगाव मधून एक घटना समोर आली आहे.कोपरगाव आगाराची बस क्र. एमएच ४० वाय ५६७९ ही स्ट्राँग रुमपासून एव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेवून जाण्यासाठी बोलावली होती.या बसमध्ये रोख रक्कम सापडल्यामुळे सगळीकडे या गोष्टीची चर्चा होत आहे.

वैजापूर-कोपरगाव आगाराची हि बस निवडणूक कामासाठी वापरण्यात आली होती.बुधवारी याच बस मधून मतपेट्या जमा करण्यासाठी नेण्यात आल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या मारत असताना संजीवनी इंग्लिश मेडियम स्कुल येथून काही विद्यार्थी धामोरीच्या दिशेने जात होते.

त्याच बसमध्ये मागच्या सीटखाली ‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांना ही रक्कम सापडली असून त्या नोटा पाचशे च्या होत्या आणि दोन बंडल त्यांना सापडले.विद्यार्थ्यांना हि रक्कम सापडल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे बसच्या कंडक्टरकडे जमा केली.

सापडलेली एकूण रक्कम ८६ हजार ५०० होती. साईराज कदम नावाच्या विद्यार्थ्याच्या प्रथम हे लक्षात आले, तेंव्हा संजीवनी इंग्लिश मेडियमचे कर्मचारी रोहित होन व सचिन भालके यांच्याकडे सापडलेली रक्कम त्याने सुपूर्द केली.

त्यानंतर हे नोटांचे बंडल वाहक सविता मनोज अडांगळे यांच्याकडे जमा करण्यात आले.आगार प्रमुख अमोल बनकर यांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे.वरील विद्यार्थ्यांनी व वाहकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान,निवडणुकीसाठी वापरलेल्या बसमध्ये ही रक्कम सापडल्याने ती रक्कम नेमकी कोणाची,याचे रहस्य अजून उलघडले नाही.कोपरगाव पोलिस स्टेशनला या संदर्भात कुठलीही नोंद नसल्याची माहिती हाती आली.