श्रीरामपूर शहरात अवैध धंदे तसेच अवैध मटक्याचे अड्डे सर्रास चालू आहेत.पण त्यावर पोलिस कारवाई करत नसल्याचे चित्र दिसत आहे.

या अवैध मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पोलिसांनी या व्यावसायिकांकडे लाचेची मागणी करून पाच हजार रुपयांची रोकड तसेच विदेशी दारूच्या बाटलीची मागणी केली होती.

त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुन्हा नोंदविला आहे. या कारवाईमुळे शहरात सगळीकडे चर्चाना उधाण आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले, पोलीस शिपाई राहुल महादेव नरवडे, पोलीस शिपाई गौतम शंकर लगड हे तिघे येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

त्यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती परंतु तडजोड केल्यावर त्यांनी पाच हजार रुपये व २६०० रुपयांची विदेशी कंपनीची दारूची बाटली मागितली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्या तिघांवर ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार श्रीरामपूरात मटक्याचा व्यवसाय करतात.तक्रारदाराच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार लाच प्रतिबंध विभाग अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती.

सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी करण्यात आली.लाच मागणी पडताळणी दरम्यान पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड केल्यावर पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

त्यानंतर आरोपी कारखिले यांनी तक्रारदार नको म्हणत असताना त्यांना त्यांच्या मटक्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणावरून तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारले व उर्वरित एक हजार रुपये व दारूच्या खंब्याची मागणी केली.

तसेच पोलीस हवालदार राहुल महादेव नरवडे यांनी तक्रारदाराच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता त्यांचा मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी २६०० रुपये किंमतीची विदेशी कंपनीची दारूच्या बाटलीची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली व पोलीस हवालदार राहुल नरवडे यांनी मागणी केलेली दारूची बाटली आणण्यासाठी पोलीस हवालदार गौतम शंकर लगड यांनी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले.

त्यामुळे वरील तिन्ही आरोपींविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगर लाच प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, उमेश मोरे, दशरथ लाड यांनी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

त्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी तुमच्याकडे लाचेची मागणी केल्यास तात्काळ अहिल्यानगर लाच प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.