शहरातील बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉनजवळ असलेल्या किराणा माल व कॉस्मेटिक मटेरियलच्या गोडाऊनला आग लागून आतील सर्व माल खाक झाला. मंगळवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली.या घटनेत गोडाऊनमधील दोन मालवाहतूक टेम्पो,आतील सर्व साहित्य, तसेच रोख रक्कम जळाली. या घटनेत सव्वाकोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

बुरूडगाव रोडवर आनंद शिंगी व सचिन शिंगी यांच्या मालकीचे एस. एस. मार्केटिंग ही फर्म आहे.मंगळवारी रात्री गोडाऊन मधील कामगार हे गोडाऊन बंद करून घरी गेले होते.त्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानक गोडाऊनला आग लागल्यावर काही वेळातच आगीने भडका घेतला.

ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली.त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला.यावेळी मात्र आगीने मोठा भडका घेतला असल्याने सावेडी व एमआयडीसीच्या अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले.

तीन वाहनांमधून पहाटे पाचपर्यंत पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग आटोक्यात आली.या गोडाऊन शेजारीच एक कृषी केंद्र होते.त्यालाही आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाने पाणी मारल्यानंतर या दुकानाचे नुकसान टळले.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली.

ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समोर आले नाही.या घटनेत काही रोख रक्कम, दोन मालवाहू वाहने,गोडाऊनमील माल, फर्निचर आदी साहित्य खाक झाल्याचे प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले.

गोडाऊनला आग लागल्यानंतर या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.सुरुवातीला मनपाच्या अग्निशमन विभागाचा पहिला बंब तातडीने दाखल झाला.

आगीचे स्वरूप पाहून अग्निशमन विभागाच्या सावेडी व एमआयडीसी येथील दोन बंबांना पाचारण करण्यात आले.एका वाहनाच्या पाच खेपा असे एकूण पंधरा बंब भरून पाणी मारल्यानंतर पहाटेच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.

हि आग विझवण्यासाठी सुमारे अडीच लाख लिटर पाणी मारण्यात आले.या गोडाऊनमध्ये तेलाचे डबे, कॉस्मेटिक असे बहुतांशी साहित्य हे प्लॅस्टिक वेस्टनमध्ये असल्याने आग लवकर आटोक्यात आली नाही.हि भीषण आग शमल्यानंतरही बुधवारी दुपारपर्यंत गोडाऊनमधून धूर निघत होता.