कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्तपणे गाड्या चालविणाऱ्या ३९ जनांविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशानुसार पोलिसांनी वाहनांवर कारवाईचे सत्र चालू केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत चालू असावी,कुठे वाद-विवाद होऊ नये, याची काळजी घेत शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलिस पथकासह वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांची तपासणी केली.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल ३९ वाहन चालकांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांन्वय्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांनी फिर्याद दिली. रोटेगाव (ता. वैजापूर जिल्हा संभाजीनगर) येथील मनोज भरतसिंग राजपूर (२९) हा अॅपे रिक्षा (एम.एच.२० टी- ३८४०) मधून दुपारी ३ वाजेच्या सुमारास कोपरगाव वैजापूर रस्त्यावर संवत्सर शिवारात कातकडे पेट्रोल पंपासमोर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जिवितास धोका होईल,अशा अवस्थेत वाहन चालविताना आढळला.त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
‘वाहन चालकांनी रस्ते वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. दारू पिऊन वाहने चालविल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल.असे आवाहन भगवान मथुरे (पोलिस निरीक्षक कोपरगाव शहर) यांनी केले आहे.