निवडणुकांच्या अधिकृत प्रचार समाप्तीनंतर पुढच्या ७२ तासांत बऱ्याच घटना घडत असतात. गुप्त पद्धतीने प्रचार करण्याच्या नावाने राजकीय पक्ष किंवा उमेदवार मतदारांना अमिष दाखवण्याचा प्रयत्न करतात.

पण मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आलेल्या अनुभवामुळे जिल्हा निवडणूक शाखा आणि पोलिस प्रशासन अलर्ट झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांद्वारे जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

पुढील दोन दिवसांत कोणत्याही प्रकारच्या अवैध प्रकार होत असल्याचे दिसल्यास मतदारांना सी-व्हिजिल अॅपवर तक्रार नोंदवता येणार आहे असे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की,जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटप, गर्दी किंवा संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दोन ते तीन ड्रोनद्वारे नजर ठेवली जाईल.

या १२ विधानसभा मतदारसंघात एकूण ३६ ड्रोन तैनात असतील असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.जिल्ह्यातील ३ हजार ७६५ मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केली जाणार आहे. अहमदनगर शहर मतदारसंघात सर्वच २९७ केंद्र तर इतर ११ मतदारसंघांतील निम्म्या मतदान केंद्रावर वेब कास्टिंग असणार आहे.

जिल्ह्यातील १२ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी २१ हजार ५७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ३८८ सेक्टर ऑफिसर, २१० सूक्ष्म निरीक्षक, ४ हजार १६८ केंद्राध्यक्ष, ४ हजार १६८ प्रथम मतदान अधिकारी, ८ हजार ४७२ इतर मतदान अधिकारी, तर ४ हजार १६८ शिपाई यांचा समावेश आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत जोरदार प्रचार केला जात होता. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक शाखेचे कर्मचारी आज मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत.

जिल्ह्यातील १२ मतदारसंघात ३ हजार ७६५ मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान होणार आहे आणि ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १९ लाख ४६ हजार ९४४ पुरुष, १८ लाख ३६ हजार ८४१ महिला, तर २०२ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांना आपले मतदानाचे केंद्र यादीतील क्रमांक, आदींची माहिती असलेल्या ९९.३७ टक्के मतदार चिठ्ठयां वाटण्यात आलया आहेत.मतदारांना मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्यासाठी स्त्री-पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगेत गर्दी झाल्यास बसण्यासाठी बेंचेस, खुर्चा, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी,स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांगासाठी व्हीलचेअर इत्यादी सुविधा मिळणार आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी माध्यमांना दिली.