इनोव्हा कार – दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात अक्षय गायकवाड (वय २५) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नगर – मनमाड महामार्गावर राहात्यातील भडांगे चहाच्या दुकानासमोर काल शुक्रवारी (दि. १३) सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातानंतर मृताचे नातेवाईक व रिपाईचे कार्यकत्यांनी पोलीस स्टेशनला जावून निवेदन दिले.संबंधित कारच्या चालकावर तसेच महामार्गाच्या कडेला असणारे अतिक्रमणावर तातडीने कारवाई करावी,अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांच्या वतीने देण्यात आला आहे.

राहाता शहरात पोलीस स्टेशन ते कात नाल्यावरील पूला पर्यंत शहरातील महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे.काही महिन्याच्या अंतरावर या ठिकाणी दुसरा बळी गेला आहे.महामार्गावरील मनमानीप्रमाणे तोडून ठेवलेले डिव्हायडर अर्थात रस्ता दुभाजक मृत्यूचा सापळा बनवण्यास व अपघातास कारणीभूत ठरत आहे.

महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी त्याचप्रमाणे महामार्गाचे दोन्हीही बाजूने अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केलेला फुटपाथ महामार्गावरच होणारी वाहनांच्या पार्किंगमुळे महामार्ग राहाता शहरात मृत्यूचा सापळा ठरत आहे.

महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन बळी गेलेले असतानाही पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.त्यामुळे अपघातस्थळी अथवा अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याची सद्बुद्धी अजूनही प्रशासनाला लाभलेली दिसत नाही.

सहा महिन्याच्या आत सलग दोन तरुणांचे रस्ते अपघातात बळी गेलेले आहेत.तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. अल्पवयीन मुल सर्रासपणे भरधाव वेगाने गाड्या चालवतात.शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांचे कुठलेही नियंत्रण नसल्याने वाहतुकीमध्ये बेशिस्तपणा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.

परिणामी अपघातात सुद्धा वाढ होत आहे,अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शहरातील महामार्ग अपघात क्षेत्र बनला आहे.रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणामुळे हा रस्ता नेहमीच अपघाताला निमंत्रण देत आहे.

या अपघात प्रकरणी रिपाई युवकचे जिल्हाध्यक्ष प्रदिप बनसोडे, तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, संतोष बनसोडे, अतिश लोखंडे, नितीन बनसोडे, सुभाष विधाते, आकाश बनसोडे, विकास बनसोडे, गणेश गुंजाळ, सचिन बनसोडे, राहुल बोर्डे, नितीन बनसोडे, प्रवीण पाळंदे, हेमंत सदाफळ, प्रमोद पाळंदे, कार्तिक सदाफळ, राहुल बनसोडे, जय पाळंदे, अविनाश वाघमारे, सुशांत शेळके, रवींद्र सोनवणे, विनोद पाळंदे आदीसह नागरीकांनी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिले.

तसेच रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण दूर करावे.तसेच वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी केली आहे. वाहतुकीच्या कोंडीत दिवसेंदिवस भर राहाता शहराचा व महामार्गाचा विचार केला तर या महामार्गाच्या बाजूने एकूण चार विद्यालये आहेत.

त्याचबरोबर बाजारतळ या महामार्गाच्या कडेला आहे.परिणामी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात महामार्गावर होत असते.शालेय चिमुकल्या मुलांना आपला जीव मुठीत धरून चालण्याची वेळ येते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रस्ता म्हणजे धोक्याची घंटा होय. राहाता शहरात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस दिसत नाही.त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत दिवसेंदिवस भर होत आहे.अपघात झाल्यानंतरच नागरिक जागे होतात त्यानंतर पुन्हा सुस्तावून जातात.

त्यामुळे एकदा अपघात झाल्यानंतर त्या विरोधात काही वेळापुरता आवाज उठवला जातो.नंतर दुसरा अपघात झाल्यानंतरच पब्लिक जागी होते.आत्तापर्यंत सरकारी दवाखाना ते पुलापर्यंत या अंतरामध्ये तीन ते चार बळी गेले आहे.मात्र प्रशासन अजून जागे झालेले दिसत नाही.विनापरवाना म्हणजे लायसन नसलेले अनेक तरुण ड्रायव्हिंग करतात.