काल राज्यभर विधानसभा निवडणूका पार पडल्या.संगमनेर मतदार संघात सुद्धा काल बुधवारी (दि. २०) उत्साही व शांततापूर्ण वातावरणात सुमारे ७४.५७ टक्के मतदान पार पडत २० हजार ६१ मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडले.
मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेत पार पडावी,यासाठी प्रशासनाने संपूर्ण काळजी घेतली होती.सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
काल सकाळी सात वाजलयापासून संगमनेर विधानसभा मतदार संघात प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून एकूण २८८ मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले.
सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे मतदानाचा वेग अतिशय कमी होता.तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांचा मोठा उत्साह दिसत होता.शहरी भागामध्ये दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.
नऊ वाजल्यानंतर नंतर मतदानाचा वेग वाढू लागला.अकरा वाजेपर्यंत जवळपास २१ टक्के मतदारांनी मतदान पूर्ण केले.त्यांनतर दुपारी बारा वाजेनंतर मतदानाचा वेग आणखी वाढत जाऊन दुपारी एक वाजेपर्यंत १ लाख १ एक हजार ११ मतदारांनी मतदान केले.
मतदानाचा वेग वाढत जाऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ८५ हजार ४५४ मतदारांनी मतदान केले.शेवटच्या टप्यात सहा वाजेपर्यंत १ लाख १३ हजार २४५ पुरुष मतदारांनी तर १ लाख २ हजार ४०२ महिला मतदार, अशा एकूण २ लाख १५ हजार ६४७ मतदारांनी मतदान करत राष्ट्रीय कर्तव्य केले.त्यामुळे काल दिसवभरात संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुमारे ७४.५७ टक्के मतदान पूर्ण झाले.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका महिलेने १५ दिवसाच्या बाळाला सोबत घेऊन मतदान केले.तळेगाव दिघे येथे एका जोडप्याने महाराष्ट्रीयन पद्धतीने पारंपारिक वेशभूषा करून मतदान केले.सावरगाव तळ येथील मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा दिसत होत्या.या ठिकाणी ८५ वर्षांच्या आजीने मतदान केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार योगेश सूर्यवंशी, वंचित आघाडीचे उमेदवार अजित वोहरा यांचे अनेक ठिकाणी बुथ दिसत होते. या उमेदवारांना मिळणारी मते निर्णय ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार बाळासाहेब थोरात डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनी विविध ठिकाणच्या बुथवर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनीही ठिकठिकाणीच्या मतदान केंद्रावरील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विविध कारणामुळे संगमनेर मतदार संघाची निवडणूक राज्यात चर्चेची आहे. त्यामुळे संगमनेरच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.