काल सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर शहरी भागामध्ये मतदान कमी प्रमाणामध्ये झाले.मात्र, ग्रामीण भागामध्ये सकाळीच मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

मात्र, यानंतर पुन्हा सायंकाळी ग्रामीण भागामध्ये काही मतदान केंद्रावर सकाळी मतदान न केलेले मतदार एकाच वेळी आल्यामुळे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदान सुरू असल्याचे पहावयास मिळाले.

मतदान करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जेव्हा मतदान केंद्रामध्ये जात होती,तर त्या व्यक्तीचे संपूर्ण मतदान होऊन बाहेर येईपर्यंत जवळपास किमान तीन मिनिटे एवढा कालावधी लागत होता.

ज्या मतदान केंद्रावर अधिकारी तत्पर होते त्या ठिकाणी मतदान वेगाने होत होते मात्र काही ठिकाणी अतिशय सावकाशीने मतदान होत असल्यामुळे त्या ठिकाणी उशिरापर्यंत मतदार मतदानासाठी थांबून असल्याचे देखील दिसून आले.

मतदारसंघातील पिंपरखेड येथे दुपारी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.यामध्ये महिलांची संख्या मोठी होती.मतदानासाठी वेळ आणि उशीर होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी विक्रमी ७८ टक्के मतदान झाले.विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २०) एकूण ३५६ मतदान केंद्रांवर ३ मतदान झाले. या मतदारसंघात एकूण तीन लाख ४७ हजार ३०३ मतदार आहेत.

यामध्ये पुरुष मतदार एक लाख ८१ हजार ५२८, तर महिला मतदार एक लाख ६५ हजार ७७५ आहेत.मतदानाची वेळ संपली तेव्हा एकूण ३५६ पैकी ९९ मतदान केंद्रांवर मतदानासाठी काही केंद्रावर रांगा लागल्या होत्या.यामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

तोपर्यंत ७८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील,सहायक निवडणूक अधिकारी गुरू बिराजदार यांनी दिली.

या वेळी ग्रामपंचायत प्रमाणेच बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी आणण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी वाढली.याशिवाय मतदानासाठी प्रशासनाने देखील अनेक उपक्रम राबवल्यामुळे त्याचाही फायदा टक्केवारी वाढण्यासाठी झाल्याचे दिसून आले.