उसापासून फारकत घेऊन परिसरातील बळीराजा भुसार पिकाकडे वळला खरा पण,भुसार पिकामुळे शेतकरी उपाशी अन् मजूर तुपाशी अशी अवस्था बळीराजाची झाली आहे.याचा प्रत्यय नुकताच कपाशी पिकात शेतकऱ्यांना आला.त्यामुळे शेती करणे आता नको नकोसे झाले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून उसाला असलेला एकच भाव, वजनात होणारी प्रचंड काटेमारी, बाईडिंग मटेरियलच्या नावाखाली होणारी लूट, सहा सहा महिने पेमेंटसाठी थांबणे, रासायनिक खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती.
उसाला लागणारा वर्षा-दीडवर्षाचा कालावधी,ऊस तोडीसाठी मजुरांना मोजावे लागणारे दहा,पंधरा हजार रुपये, या सर्व बाबींमुळे नगदी पीक म्हणून उल्लेख असलेल्या ऊस पिकाबाबत परिसरातील बळीराजा उदासीन झाला.
त्याने जणू ऊस पिकापासून फारकतच घेतली आहे.या उलट उसाऐवजी कपाशी, सोयाबीन किंवा कपाशी व कांदा अशी वर्षात दोन पिके निघत असल्याने आणि या पिकांचे ऊसापेक्षा जास्त पैसे होत असल्याने मोठ्याप्रमाणात शेतकरी ऊस पीक सोडून भुसार पिकांकडे वळला आहे.
सुरुवातीला ही संख्या कमी असल्याने बरोबर ताळमेळ बसत होता.परंतु, सर्वच शेतकरी याकडे वळल्याने मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे आणि हीच नस पकडून मजुरांनी मनमानी करून मजुरीच्या दरात प्रचंड वाढ केली.
पूर्वी शेतात पायी येणारे मजूर आता जाण्या येण्यासाठी टेम्पोसारखे काही साधन असल्याशिवाय शेतात येत नाहीत.रोजंदारी वाढली तरी देखील कामाचा वेळ मात्र वाढला नाही.तो आणखी कमी करण्यात आला.पूर्वी खुरपणीसाठी साडे नऊ वाजता येणारे मजूर रोजंदारी वाढवून देखील अकरा वाजता येत आहेत.
दुपारी दीड ते अडीच एक तास जेवणाची सुट्टी घेतली जात आहे.सायंकाळी सहा वाजता सुट्टी घेणारे आता साडे पाच वाजताच सुट्टी घेत आहेत.त्यातच पाणी पिण्याची सुट्टी, चहाची सुट्टी या मध्ये अर्धातास जातो तो वेगळाच.म्हणजेच पूर्वी सात ते आठ तास शेतात काम करणारे मजूर आता जेमतेम पाच ते साडे पाच तास काम करतात.
रोजंदारी मात्र पुर्वीच्या चारपट झाली आहे.महागाई वाढली आहे,हे मान्य आहे.परंतु त्या तुलनेत शेतमालाला भाव वाढलेले नाहीत.हीच परिस्थिती पुरुष मजुराची आहे.सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजता सुट्टी आणि सहाशे ते सातशे रुपये रोजंदारी आहे.
आज शेतात कामासाठी येणाऱ्या मजुरांना मोटारसायकल लावण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. महागाईच्या तुलनेत शेतमालाला बाजारभाव मिळत नाही.कमावलेल ते मजुरालाच द्यावं लागतं,पूर्वीची उत्तम शेती ही व्याख्या कधीच इतिहास जमा झालीय, आता फक्त उत्तम मजूर हेच खरं….
मजुरीचे दर इतक्या मोठ्याप्रमाणात वाढले आहेत.त्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस अत्यंत जिकीरीचे होत चालले आहे. त्यातच शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके, विजेचे दर, ट्रॅक्टर मशागतीचे दर अक्षरशः आभाळाला भिडले आहेत.या सर्वांची गोळा बेरीज केली असता शेतकऱ्यांच्या हातापदरात काहीच राहत नाही.यामुळे शेती करणे आता नको नकोसे झाले आहे.