शेवगाव तालुक्यात शासकीय कापूस निगमची खरेदी १ लाख क्विंटल झाली असून,इतर जीनिंगची दीड लाख क्विंटल अशी एकूण जवळपास अडीच लाख हजार क्विंटल कपाशीची खरेदी झाली आहे.शासकीय कापूस खरेदीसाठी बाजार समितीने शेतकरी नोंदणी मोहीम राबविल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे.

शेवगाव तालुक्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जीनिंग पाहता शेवगावसह पाथर्डी, नेवासा, पैठण, गेवराई, अंबड आदी भागातील कापूस येथे विक्रीला येत आहे.केंद्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याअगोदर ६७०० ते ६८०० रुपये असा भाव देत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली.

त्यात खेडा खरेदीत काटामारी,सूट माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार झाला.उत्पनाला मिळणारा कमी भाव पाहता काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कपाशीची थप्पी आहे तशीच ठेवली.

सुमारे एका महिन्यापासून केंद्र शासनाची खरेदी सुरू होताच खासगी खरेदीचा गाशा गुंडाळला गेला.या केंद्रावर प्रतवारी नुसार साधारण ७४२१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कपाशीची आवक वाढली.

त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या.परिणामी शेतकऱ्यांना त्रास होऊ लागला.ही बाब निदर्शनास आल्याने बाजार समितीने नावनोंदणी सुरू केली.शेतकऱ्याने नाव नोंदविल्यानंतर ज्या दिवशी त्यांचा नंबर असेल त्याच्या आदल्या दिवशी त्यांना फोनद्वारे उत्पादन घेऊन येण्याची माहिती दिली जाते.

त्याच बरोबर पीक नोंदीचा उतारा व आधार कार्ड घेतले जाते आणि त्याच दिवशी कापूस खरेदी होतो.आठ दिवसाच्या कालावधीत त्यांच्या बँक खात्यावर रक्कमही जमा होत असल्याने शेतकऱ्यांचा त्रास थांबला गेला.

रिद्धी सिद्धी जीनिंग,मारुतराव घुले पाटील जीनिंग, दुर्गा फायबर्स, अन्नपूर्णा जीनिंग व बालम टाकळी येथील साई कोटेक्स या ठिकाणी शासकीय खरेदी असून आज पर्यंत येथे १ लाख क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे.

ही खरेदी सुरू झाल्याने खासगी व्यापाऱ्याकडे येणारी आवक थांबल्याचे दिसून येते. पुढे भाववाढ होईल,ही अपेक्षा नसल्याने अनेक शेतकरी आता शासन खरेदी केंद्रात कपाशीची विक्री करत आहेत.

दरम्यान, ‘सीसीआय’ वरील १ लाख क्विंटल तसेच रिद्धी सिद्धी २५ हजार २०० क्विंटल, अन्नपूर्णा कोटेक्स १५ हजार ९००, दुर्गा फायबर्स २० हजार ७१९, हनुमान जीनिंग ८ हजार ४९५, तिरुपती कोटेक्स ६ हजार ५००, मारुतराव घुले पाटील जीनिंग ६ हजार ३००, साई कोटेक्स बालमटाकळी ९ हजार ८००, वाय. के. कोटेक्स अमरापूर ३ हजार २००, खेडा खरेदी ४६ हजार क्विंटल अशी एकूण सुमारे २ लाख ५० हजार क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे.