सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होत असतात.या काळात शिर्डी शहरात प्रचंड गर्दी होते.नागरिकांच्या आणि साईभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात कडक उपाय योजना करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला अनेक जण रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करतात.वाईन शॉप्स,बिअर बार्स,आणि परमिट रूम्स यांना विशेष परवानगीमुळे उशिरापर्यंत चालू ठेवले जाते.परिणामी,मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढते.
असे चालक अनेकदा नशेच्या अवस्थेत वाहन चालवत असल्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होतो.शिर्डीला जोडणाऱ्या नगर- मनमाड, शिर्डी-नाशिक, आणि शिर्डी-संभाजीनगर मार्गावरही वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.
अशा परिस्थितीत, मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालक अपघातांना कारणीभूत ठरू शकतात.शिवाय,नशेत असलेले काही जण साई भक्तांनाही त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिर्डी पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी यंदा अधिक सतर्कता दाखवून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे नियोजन करावे.
ड्रंक अँड ड्राईव्ह टाळण्यासाठी शहरातील मुख्य चौक, प्रवेशद्वारे,आणि प्रमुख रस्त्यांवर वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी.या शिवाय,विना नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर तसेच चित्र विचित्र नंबर प्लेट असलेल्या वाहनांवरही कारवाई केली जावी.
नशेच्या अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना दंड करावा,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दारू किंवा इतर नशिले पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणे केवळ कायद्याचे उल्लंघनच नाही, तर ते इतरांच्या जीवावरही बेतते.
अपघात आणि गुन्हे टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन ड्रंक अँड ड्राईव्हवर नियंत्रण ठेवले पाहिजे.यंदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी शिर्डी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
भक्तीमय वातावरण आणि सुरक्षितता शिर्डीत लाखोंच्या संख्येने साईभक्त हजेरी लावतात.त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी योग्य त्या उपाय योजना राबवल्यास साईदर्शनासाठी आलेल्या भक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल.
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना,शिर्डीत भक्तीमय आणि शांततामय वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे.