शेवगाव तालुक्यातील जिनिंगमध्ये १ लाख ३२ हजार १७५क्विंटल कपाशीची खरेदी झाली आहे.कापसाला मिळालेलया या दरामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली असून,खर्च व दर यात मोठी तफावत आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.हवामानात होत असलेल्या बदलाने यंदा कपाशी उत्पन्नाचा लवकरच झाडा झाला आहे.

पुरेपुर दोन वेचण्यानंतर उत्पन्नात घट होत गेली, ही घट वेचणीच्या रोजंदारीला परवडत नसल्याचे दिसते.त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी त्यावर नागंर फिरवला आणि गहू, हरभरा पिकांची पेरणी केली.

घरात आलेले कपाशीचे उत्पन्न बाजारपेठेत येताच दराची घसरण चालू झाली.सुरवातीला सात ते आठ हजार रुपये क्विटल दर मिळेल,अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.मात्र प्रत्यक्षात मिळालेल्या दराने शेतकरी संतापाची भावना व्यक्त करू लागला.

६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलपासून सात हजार रुपये असे दर होत गेले.आता त्यात पुन्हा घसरण झाली आणि ६ हजार ७०० ते ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर झाले आहेत.त्यातच उशिराने सुरू झालेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रात माऊंवर (ग्रेड) ची कात्री सुरु झाली.

त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दराने काही खरेदी होत असल्याचे पाहून शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे.आता निवडणुका संपल्या आहेत.त्यामुळे आपला आवाज कोणीही ऐकणार नाही याची शेतकऱ्यांना जाणीव झाल्याने तो आलेले उत्पन्नाचे दाम घेऊन निमूटपणे परतताना दिसतो.

शेतीच्या मेहनतीपासून बियाणे, रासायनिक खत, औषधे, खुरपणी,वेचणी, मजुरी असा खर्च पाहता मिळत असलेला कपाशी दर हा पीक खर्च आणि उत्पन्न यामध्ये कमालीची तफावत असणारा आहे.मार्च महिन्यानंतर कपाशीचे दर वाढू शकतात,असा काहींचा अंदाज आहे.

मात्र,आर्थिक अडचणी अभावी एवढे दिवस उत्पन्न ठेवण्यास शेतकरी तग धरू शकत नाही.परिणामी दरवर्षीप्रमाणे तोटा अथवा मुद्दल ही नशिबाची थट्टा ठरलेली असल्याचे मानून शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.