राहुरी परिसरात वन विभागाच्या दुर्लक्षित भुमिकेने बिबट्याचा वावर मानवी वस्त्यांकडे वाढला आहे.प्रत्येक दिवशी कोणत्या न कोणत्या गावात बिबट्याचे दर्शन होत असतानाच काल ताहाराबाद परिसरात मोठा अनर्थ टळल्या.रुद्र सचिन गागरे (वय ६) या चिमुरड्याला बिबट्याने जबड्यात घेतले.
यावेळी वडिल सचिन गागरे यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याशी झुंज देताना मुलाची सुटका केल्याचा प्रकार घडला.मुलाला बिबट्याचे दात लागल्याने त्यास सिव्हील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.
ताहाराबाद येथील संत महिपती महाराज मंदिर परिसरात असलेल्या झावरे वस्तीवर काल रविवारी (दि.८) रोजी सायंकाळी ६ वाजता प्रकार घडला.सचिन गागरे हे ताहाराबाद येथील बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी गेले होते.त्यांची पत्नी शेतामध्ये कामासाठी गेली होती.
बाजार करून घरी परतल्यानंतर त्यांनी घरात पाहिले असता मुलगा रुद्र दिसला नाही.रुद्र घरात न दिसल्याने सचिन गागरे हे मुलाला पाहण्यासाठी घराबाहेर आले.वडिलांची गाडी आलेली पाहून घराकडे धाव घेतलेल्या रुद्रवर लगतच्या काटवनात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत हल्ला चढवला.
बिबट्याचा व मुलगा रुद्र याचा मोठा आवाज आला.रुद्र बिबट्याच्या तावडीत असल्याचे पाहून वडिलांनी जीवाची पर्वा न करता त्याचा सामना केला.यात सुदैवाने बिबट्याने रुद्रला तिथेच सोडून धूम ठोकली.बिबट्याच्या हल्ल्यात रुद्रच्या पाठीवर दाताच्या जखमा झाल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती समजताच सरपंच बापू जगताप, सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू झावरे, पप्पू माळवदे, निवृत्ती घनदाट, अमोल किनकर आदींसह परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली.रुद्र यास लगतच्या ताहाराबाद ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास अहिल्यानगर येथील सिव्हील रुग्णालयात नेण्यास सांगितले. गागरे कुटुंबिय व ग्रामस्थांनी रुद्र यास पुढील उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सरपंच बापू जगताप यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाही.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याच्या वास्तव्याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे.एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वन विभागाला जाग येते. निष्ठुर अधिकाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.
घटना घडल्यानंतर वन विभागाशी संपर्क साधण्यात आला. परंतु वन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.वन विभागाला बिबट्याबाबत अनेकदा माहिती देऊनही कोणतीही उपाययोजना केली जात नाही.
ताहाराबाद, म्हैसगाव परिसरात मोठे जंगल क्षेत्र आहे.तसेच ऊस क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याने बिबट्या आसरा घेण्यासाठी आता मानवी वस्त्यांकडे आगेकूच करीत आहे.