शहरात व शहरालगत असलेली मोकळी मैदाने आणि काटवने व्यसनाधिन लोकांसाठी अड्डे बनले आहेत.खुल्या मैदानांवर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सिगारेटचे धुराडे फुंकत रात्री उशिरापर्यंत टवाळखोर धिंगाणा घालत असतात.

याशिवाय नगर-मनमाड रोडवरील काही ढाब्यांवर दारू विक्री होते. अनेकजण बाहेरून दारू आणून हॉटेल-ढाब्यांवर पीत बसतात.अशांवर उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

निवडणूक निकालानंतर पदाधिकारी-कार्यकर्ते यांचे ढाब्यांवर बसून जय-पराजयाची गणिते मांडण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीचा ताण कमी करण्यासाठी,तर कुणी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आराखडे बांधण्यासाठी हॉटेल,ढाब्यांचा आधार घेत आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खाटिक गल्लीत सर्रास दारू पिली जाते. तळीरामांची गर्दी या ठिकाणी सतत असते.पालिकेने आठवडी बाजारात बांधलेल्या ओट्यांवर सोमवार सोडून इतर दिवशी दारू व गांजा पिणाऱ्यांची संख्या अधिक असते.

त्यामुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत.कर्मवीर नगरमागील मोकळी जागा, काटवन, केबीपी मैदान, तसेच पोस्ट ऑफिसशेजारची खुली जागा येथे रात्रीच्या वेळी दारू पिणारे बसलेले असतात.

अवैध धंदे किवा अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जाते.यापुढेदेखील अवैधरीत्या दारू विक्री किंवा इतर मादक पदार्थांची विक्री करण्याचा कुणी प्रयल केल्यास,कठोर कारवाई होईल.असे भगवान मथुरे (पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर) यांनी सांगितले.