शहरातील प्रमुख २३ रस्ते व १ नाल्याच्या कामासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यातील १३ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून ही कामे ४५ टक्के पूर्ण झाली आहेत तरी उर्वरित कामेही लवकरच सुरू होत आहेत.महानगरपालिके मार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालातील इतर कामांसाठीही लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.

सध्याच्या कामांसाठी जानेवारी २०२६ अखेर मुदत आहे.मात्र ही कामे मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मनपाचे प्रशासक तथा आयुक्त डांगे यांनी सांगितले.

डांगे यांनी शहरात सुरू असलेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला.सध्या १३ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.ही कामे भौतिकदृष्ट्या ४५ टक्के पूर्ण झालेली आहेत.तर आर्थिकदृष्ट्या ३० टक्के पूर्ण झाली आहे.या २३ रस्त्यांच्या माध्यमातून सुमारे १७ किलोमीटर लांबीचे रस्ते होणार आहेत.

तर दोन किलोमीटर लांबीच्या नाल्याचे सुशोभीकरण होणार आहे.सदर कामे विकास योजनेतील रस्त्याची असल्याने विकास योजनेच्या रुंदी प्रमाणे होत आहेत.त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमण काढणे,इलेक्ट्रिक लाइन, पाण्याची लाइन स्थलांतरित करून दोन्ही बाजूने गटार करून काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे.

या कामांकरिता जुलै २०२४ महिन्यात कार्यादेश देण्यात आलेला आहे.कामाची मुदत जानेवारी २०२६ पर्यंत आहे.मात्र, मुदतपूर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प महानगर पालिकेने केला आहे.त्या दृष्टीने मनपाचे प्रयत्न असून मनपा आर्थिकदृष्ट्या व प्रशासकीयदृष्ट्या सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या सुरू व प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे.त्याचबरोबर वारंवार रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची वेळ मनपावर येणार नाही त्यामुळे नागरिकांना चांगली सेवा उपलब्ध होईल.

या कामांसाठी आत्तापर्यंत शासकीय अनुदानातील २१ कोटी रुपये व मनपा हिस्स्यातील ४.५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.उर्वरित हिस्स्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.