संपूर्ण महाराष्ट्रात अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे,पुढच्या चार दिवसात जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.त्यामुळे कांदा, कापूस आणि तुरीला फटका बसण्याची शक्यता आहे.

मागील दोन दिवसापासून जिल्हाभरात दिवसभर ढगाळ वातावरण आहे.त्यामुळे या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असून,थंडीची तीव्रता सुद्धा कमी झाली आहे.हवामान खात्याने ६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी पावसाच्या सरी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.सध्या जिल्ह्यात कापसाची वेचणी सुरू आहे.बहुतांश ठिकाणी कापसाची तिसरी वेचणी संपण्याच्या मार्गावर आहे.

उसाचे गाळप सुरू झाल्यामुळे ऊसतोडणी सुरू आहे.अशा परिस्थितीत रब्बी पिकांची पेरणी देखील सुरू आहे.जवळपास ५५ टक्के पेरणी झाली आहे. खरीप हंगामातील कापूस, तूर वगळता सर्वच पिकांची काढणी पूर्ण झालेली आहे.

तसेच राज्यात कांदा काढणी देखील सुरु आहे.त्यामुळं या अवकाळी पावसाचा फटका कापूस, कांदा आणि तुरीला बसणार आहे.सध्या काही ठिकाणी रब्बी हंगामातील ज्वारीची वाढ एक-दीड फूट झालेली आहे.

त्यामुळे ज्वारीला किंचितसा दिलासा मिळणार आहे.तसेच गव्हाची पेरणी सुरू असुन काही ठिकाणी त्याची उगवण झाली आहे.त्यामुळे अवकाळी पाऊस आला तरीही पिकांच्या नुकसानीचे प्रमाण किंचितसे असणार आहे असे सांगण्यात आले आहे.