नगर तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, गावरान कांदा, लसूण व इतर चारा पिकांची पेरणी झाली आहे.तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीचे पीक निम्म्याने कमी झाले असून, गहू व हरभरा या पिकांच्या पेरणीच्या वाढ झाली आहे.

रब्बी हंगामातील ज्वारीसाठी पोषक वातावरण आहे.मात्र गहू, हरभरा, गावरान कांदा व लसूण या पिकांवर अचानक पडलेल्या थंडी व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, मर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.अचानक पडलेल्या थंडीमुळे पिकांची वाढही खुंटली आहे.

गावरान कांद्याच्या लागवडीचे प्रमाण देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असते.गावरान कांद्याची लागवड १३ हजार २८३ हेक्टर क्षेत्रावर झाली असून, अजूनही काही भागात लागवड सुरू आहे.

अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे गहू व हरभरा पिकावर रोगांचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे.नगरमध्ये सरासरी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी ३५ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रावर होत असते.

मात्र चालू वर्षी ज्वारीच्या पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली असून,फक्त १४ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे.ज्वारी पिकाची जागा गहू, हरभरा या पिकांनी घेतली आहे.त्यामुळे तालुक्यात यंदा गहू, हरभरा या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

तसेच तालुक्यात सध्या गावरान कांद्याची काढणी सुरू असून,उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे.सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वातावरणाच्या बदलामुळे लाल कांद्यावर विविध रोगांचे आक्रमण झाले होते.

त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली.एकरी उत्पादन जवळपास अर्ध्याने घटले.लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असला तरी त्याच्या उत्पन्नात घट झाली आहे.

चालू वर्षी तालुक्यातील सर्व भागात मुबलक प्रमाणात पाऊस झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या उन्हाळ्यात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील विविध भागात पाणीटंचाई भासणार आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज आहे.