श्रीरामपूर- बाभळेश्वर रस्त्यावरील वसंत बहार मंगल कार्यालयानजीक, डी. पॉल. शाळेकडे जाणाऱ्या टर्नसमोर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टाकण्यात आलेल्या नियमबाहा गतिरोधकामुळे अनेक अपघात घडत आहेत.या गतिरोधकावर संबंधित ठेकेदाराने पांढरे पट्टे मारले नसल्याने गतीरोधक लक्षात येत नाही, त्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्यांचे अनेक अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत.
येथील बाभळेश्वर-संगमनेर रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले.शहरालगत हा रस्ता सूतगिरणी फाट्यापासून सुरू होतो.या रस्त्यावर जोड रस्ते लक्षात घेऊन जागोजागी गतीरोधक टाकण्यात आले.त्या गतीरोधकांवर पांढरे पट्टे देखील मारण्यात आले.परंतु शहरात येणाऱ्या लेनवर शुभम मंगल कार्यालयासमोर गतीरोधक टाकण्यात आला नव्हता.
त्यामुळे गतीरोधक नसल्याने शाळेतील विद्यार्थी, पालक,शिक्षक व आगाशे नगर परिसरातील रहिवाशांची मोठी अडचण होत होती.ही चूक लक्षात आल्यावर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर तीन महिन्यांनी संबंधित ठेकेदाराने गतीरोधक टाकला.इतर ठिकाणी दोन गतीरोधक असताना या ठिकाणी फक्त एक गतीरोधक टाकण्यात आला.हा गतीरोधक जास्त उंचीचा असल्याने व त्यावर पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहन धारकांना तो लक्षात येत नाही.
त्यामुळे गतीरोधकावर भरधाव वाहने आदळून अपघात घडत आहेत.कमीत कमी दहा ते बारा वाहनधारक गतीरोधकवर आदळून रस्त्यावर पडले आहेत.यात अनेक तरुण, महिला जखमी झाले आहेत.त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या गतीरोधकाची उंची कमी करावी.तसेच तात्काळ या गतीरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात यावे,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रस्ता निर्मिती करताना जोड रस्ते लक्षात घेऊन कुठे गतीरोधक टाकायचा हे आधीच ठरलेले असते.त्यानुसार रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर जोड रस्ते लक्षात घेऊन गतीरोधक टाकण्यात येतात.या सूत्रानुसार बाभळेश्वर – श्रीरामपूर रस्त्यावर जागोजागी गतीरोधक टाकण्यात आले.बसंत बहारजवळील डी. पॉल शाळेकडे जाणाऱ्या जोड रस्त्यावर फक्त बाभळेश्वरकडे जाणाऱ्या लेनवर गतीरोधक टाकण्यात आले.
मात्र, बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या लेनवर शुभम मंगल कार्यालयावमोर गतीरोधक टाकण्यात आला नाही.त्यामुळे गतीरोधक नसल्याने येथे अपघात घडत होते.नंतर पांढरे पट्टे नसलेला गतीरोधक टाकल्याने अपघात वाढले आहेत.तरी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी,अशी नागरीकांची मागणी आहे.
गतिरोधकावर पांढरे पट्टी नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहे.विशेषतः रात्री होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.अपघात झाल्यावर होणारा आवाज ऐकून स्थानिक रहिवाशांनी अनेकदा अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.तरी अपघात रोखण्यासाठी तात्काळ गतीरोधकावर पांढरे पट्टे मारावेत.ठेकेदार करत असलेला मनमानी कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहत नाही का ? असा सवालही नागरिकांनी केला आहे.