मान्सून कर्जतच्या बहुतांश भागात दमदार बरसला.त्यामुळे खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामातही पिके चांगलीच बहारात आहेत. मात्र, यंदा ज्वारी पेरणीत काहीसी घट झाली आहे.मका, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची लागवड काहीसी वाढली आहे.

सोमवारपासून थंडीची लाट वाढली असून गहू, हरभरा यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

यंदा कर्जत तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे.अनेक महसुली मंडळात खरीप पिकानंतर रब्बी पिकांची लागवडही चांगली झाली आहे.

मात्र, यंदा ज्वारीची पेरणी काहीसी कमी झाली. शेतकऱ्यांनी मका, गहू, तूर लागवडीकडे मोर्चा वळविल्याचे कृषी विभागाकडे असणाऱ्या पीक नोंदी पाहून लक्षात येत आहे.यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक मका पिकाची लागवड झाली असून ५ हजार ८९२ हेक्टरची नोंद झाली आहे.

सरासरी २७५ टक्क्यांहून अधिक पेरणी झाली आहे. या पाठोपाठ गहू ६ हजार ११६ हेक्टर, तर ज्वारीचे ५० हजार १४३ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना २० हजार ६२५ हेक्टरवर (अवधी ४१ टक्के) लागवड झाली आहे.

यासह हरभरा ८ हजार ५६२ हेक्टरची नोंद कृषी दफ्तरी नोंद झाली आहे.काही शेतकऱ्यांनी तूर, करडई, जवस, तीळ, सूर्यफूलाची ही लागवड केली आहे. कांदा पिकाने सरासरीच्या पुढे जात १३ हजार १६० हेक्टरवर लागवड झाली आहे.

रब्बी हंगामात पिकांवर कीड आणि रोगराईचे प्रमाण अल्प असते. बहुतांश ठिकाणी रब्बी पिकांनी चांगला बहर घेतला आहे.मात्र,तूर पिकांवर शेंगा पोखरणारी अळी,ज्वारीवर चिकटा रोग पडण्याची शक्यता असते.यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कृषी विषयक सल्ला घेत त्यास अटकाव करावा.तसेच खत व्यवस्थापन करून योग्य मात्रा द्यावी.