येथील दादा पाटील महाविद्यालयास नुकताच झेप आंतरराष्ट्रीय फाउंडेशन मुंबई यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. महाविद्यालयाने ‘मोबाइलचे दुष्परिणाम’ या विषयावर राबविलेल्या विविध उपक्रमांची नोंद घेऊन हा पुरस्कार ‘आंतरराष्ट्रीय डिजिटल डेटॉक्स डे’ निमित्त मुंबईत मंत्रालयाच्या प्रांगणात देण्यात आला.

मोबाइलमुळे आज मानवी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे.तसेच तरुणांमध्ये मोबाइलचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.त्यामुळे नैराश्य, हिंसाचार यासारख्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

याबाबत सामाजिक प्रबोधन करण्याचे कार्य ड्रोप आंतरराष्ट्रीय फाउंडेशन संस्था करते.ही संस्था जगातील ७० हून अधिक देशात जवळपास ७५ लाख सदस्य जगभरात कार्य करीत आहेत.

दादा पाटील महाविद्यालयाने दोन वर्षापासून ड्रोप संस्थेच्या माध्यमातून विविध व्याख्याने, मूकनाट्य, शपथ अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोबाइलच्या व्यसनापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, यासाठी सतत प्रयत्न केले.

त्याचीच नोंद घेत झेप फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष रेखा चौधरी व समन्वयक वैशाली चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार महाविद्यालयास प्रदान केला.आंतरराष्ट्रीय डिजिटल ‘डेटॉक्स डे’निमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई या ठिकाणी पुरस्कार महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, आय. क्यू.ए.सी.चे प्रमुख डॉ. संदीप पै, प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दादा पाटील महाविद्यालयातील कार्तिक खराडे, प्रकाश शिंदे, अजित पवार, कल्याणी कोकाटे, अशिता काळे, वैशाली महानवर या विद्यार्थ्यांनी प्रा. स्वप्निल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार वितरण ठिकाणी सादर केलेल्या मूकनाट्याने सर्वांचे लक्ष वेधले.