दिवसेंदिवस कृत्रिम फुलांचा वापर वाढत असल्यामुळे नैसर्गित फुलशेती धोक्यात आली आहे. सणासुदीच्या काळात फुलांना मोठी मागणी असते; मात्र अलीकडे प्लास्टिक फुलांची विक्री वाढल्याने शेतकरी उत्पादीत फुलांची मागणी कमी होत आहे.
प्लास्टिक फुलांवर बंदी आणण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.प्लास्टिकचा वापर वाढल्याने पर्यावरणीय अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे प्लास्टिक बंदीच्या चर्चा होत आहेत. सणासुदीच्या तोंडावर प्लास्टिकच्या फुलांची बाजारात मोठी उपलब्धता आहे.
त्यामुळे एकीकडे पर्यावरणाचा, तर दुसरीकडे फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर विक्रीचा प्रश्न उभा आहे. यापूर्वी मर्यादित फुलांच्या प्लास्टिक प्रतिकृती असलेली फुले बाजारात होती; मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर झेंडू, निशिगंध, ऑर्किड,गुलाब, जरबेरा यांची तर सोबतच आंब्याच्या तोरणमाळा विक्रीसाठी आहेत.
त्यामुळे झेंडू उत्पादन शेतकऱ्याची बाजारपेठ अडचणीत आली आहे. जवळपास २५ टक्के फटका बसत असल्याचे झेंडू उत्पादकांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी आधीच कर्ज काढून शेडनेट व पॉलेहाऊसमध्ये गुलाब, शेवंती, अॅस्टर, निशिगंध, जरबेरा, ऑर्किड यांसारख्या व्यावसायिक फुलांच्या लागवडी केल्या आहेत.
मात्र प्लास्टिक फुलांनी बाजारपेठेत केलेले आक्रमण शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मोठा फटका बसत आहे. सण उत्सवाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी फुलांच्या लागवडी केल्या आहेत; मात्र प्लास्टिक फुले तुलनेत तुलनेत स्वस्त आहेत.
पर्यावरणात ती हानीकारक आहेत; पण तरीही तुलनेत नैसर्गिक फुलांना यावर्षी कमी मागणी आहे.प्लास्टिक फुलांना गंध, सुवास नसतो.
तरीही त्याची सहज उपलब्धतता, दिखाऊपणा आणि स्वस्तपणा, यामुळे लोकांचा कल प्लास्टिकच्या फुलांकडे वाढला आहे.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी सरकारने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.
चीनी बनावटीच्या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांमुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे फुलशेतीला धोका निर्माण होत आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनीही प्लास्टिकची फुले वापरावर स्वतःहून बंदी घालणे गरजेचे आहे.
अलीकडच्या काळात वेडींग डेकोरेशनच्या थीममध्ये स्टेज हॉल व लॉनची सजावट फुलांनी करण्याची क्रेझ वाढत आहे. तसा पर्यायदेखील अनेक लॉन, मॅरेज हॉल किंवा डेकोरेशन व्यावसायिक देत असतात.
नैसर्गिक फुलांच्या तोडीस तोड असणारी कृत्रिम फुले सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा सर्वाधिक वापर होत आहे. याशिवाय ही फुलं वारंवार वापरात येत असल्यामुळे त्याचा खर्चदेखील कमी आहे.